|Friday, December 13, 2019
You are here: Home » संवाद » आभाराचा महिना

आभाराचा महिना 

कोणी स्वतःहून येऊन आपले आभार मानेल अशी आशा करण्यापेक्षा आपण स्वतःपासून सुरुवात करा. समाजात बदल घडवायचा असेल तर प्रत्येकाने सुरुवात करायला हवी.

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात रोज करायची आणि कधीतरी करायची अशी कामं असतात. शिवाय चूक आणि बरोबर अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी असतात. कंटाळा घालवून रोजची कामं करणं आणि सकारात्मक विचारांचा वापर करून चुकीच्या गोष्टींवर मात करणं महत्वाचं आहे. चांगल्या आणि उत्तेजित कामांच्यावेळी उत्साह वाटत असल्याने अशा कामांची दखल घेतली जाणं महत्वाचं आहे.

आभार आणि प्रोत्साहन या गोष्टी फक्त नात्यातच सफल ठरतात असं नव्हे तर समाजात इतरत्र वावरतानाही त्या आपल्याला आनंद देतात. अगदी बागेत, रस्त्यावर, दवाखान्यात, पोलिस चौकीत, शाळेत सगळीकडेच एक ‘थँक यू’ म्हणाल्यावर तुमचं काम आणखी उत्तम होतं.

प्रत्येकजणच रुटीनचं काम करत असतो. त्यात त्याला कंटाळाही येत असतो. आपल्या कामाचं कुणालातरी कौतुक आहे, ही भावनाच चांगली असते. शिवाय लोकांनी नुसतीच आपली कामं करण्यापेक्षा ती आनंदाने आणि आपल्याविषयीच्या चांगल्या भावनेने केली तर त्याचा जास्त फायदा होतो. कधीतरी भाजीवालीला चांगली भाजी दिल्याबद्दल ‘थँक यू’ म्हणालात, रिक्षावाल्यांना ‘थँक यू’ म्हणालात तर त्यांना प्रोत्साहन मिळतं.

आईवडिलांनी जन्म देऊन पायावर उभे केले यात त्यांनी काय विशेष केलं, ते त्यांचे कर्तव्यच होते, हे म्हणणाऱयांपाशी कृतज्ञतेचा एखादा अंश तरी कसा शिल्लक असेल? जीवनाच्या प्रवासात कोणी नोकरी लावून देतो, कोणी शाळेत डोनेशनशिवाय प्रवेश मिळवून देतो, कोणी उसने पैसे देतो, कोणी ओळखीच्यांना सांगून घर भाडय़ाने मिळवून देतो, कोणी उत्तम सल्ला देतो, कोणी मानसिक आधार देतो, कोणी लग्न जमविण्यासाठी निःस्वार्थीपणे खटाटोप करतो, कोणी यापैकी काहीच न करता स्वतःच्या व्यवसायात नीतीमत्तेची जपणूक करून समाजाच्या खिशातल्या पैशांची बचत करतो, कोणी झाडे लावतो, कोणी मोफत दवाखाने चालवतो, कोणी पाणपोयी काढतो, कोणी अवडंबर न करता यथाशक्ती अन्नदान करतो या साऱया गोष्टींविषयीची कृतज्ञता माणूस या नात्याने आपल्या मनात निर्माण होते का याची चाचपणी प्रत्येकाने करावयास हवी.

आई-वडील, भाऊ-बहीण, गुरुजी, शेजारी-पाजारी, सहकारी-मित्र, नातलग, ओळखी-अनोळखी असे भोवतीचे सारे लोक आपल्यावर कळत नकळत उपकार करीत असतात. त्यांची अपेक्षा असो वा नसो त्यांच्याविषयीची कृतज्ञता आपल्या मनात जागृत झाली की पुढचं सारं आयुष्य ‘कृतघ्न’ या शब्दाशिवाय पूर्णत्वास जाईल.

 सूर्याचा प्रकाश, वातावरणातली हवा, ढगातले पाणी, धरतीमधली नवसृजनाची शक्ती या साऱया गोष्टी ज्याने त्याने द्यायच्या नाकारल्या तर काय होईल? पूर्णपणे फुकट, मुबलक आणि निरपेक्ष अशा पध्दतीने ज्यांच्याकडून हे सारं मौलीक किमतीचे धन प्राप्त होते त्यांच्याविषयी अपरंपार कृतज्ञता भाव प्रत्येकाच्या मनात असावयास हवा.

Related posts: