|Friday, December 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » 2024 पूर्वी देशभरात एनआरसी

2024 पूर्वी देशभरात एनआरसी 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विधान : पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी अंमलबजावणी

वृत्तसंस्था/ रांची 

 झारखंडच्या चक्रधरपूर आणि बहरागोडामध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी प्रचारसभा घेतली आहे. 2024 मध्ये मते मागण्यासाठी येण्यापूर्वी देशभरात एनआरसी लागू करून घुसखोरांना वेचून बाहेर काढण्याचे काम भाजप करणार आहे. एनआरसी का लागू करत आहेत, घुसखोरांना का हाकलत आहात, कुठे जातील, काय खातील अशी विचारणा राहुल गांधी करत आहेत. पण हे घुसखोर राहुल गांधी यांची चुलत भावंड आहेत का, असे प्रश्नार्थक विधान शाह यांनी केले आहे.

हेमंत सोरेन आणि काँग्रेसचा उद्देश केवळ सत्ताप्राप्ती हाच आहे. तर भाजप झारखंडला विकासाच्या मार्गावर नेऊ इच्छितो असे शाह यांनी म्हटले आहे. गृहमंत्र्यांनी चक्रधरपूरमध्ये पक्ष प्रदेशाध्यक्ष आणि भाजप उमेदवार लक्ष्मण गिलुवा तसेच बहरागोडामध्ये भाजप उमेदवार कुणाल षाडंगी यांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतली आहे.

राहुल गांधींना आव्हान

राहुल गांधी सोमवारी झारखंडमध्ये असून त्यांना काँग्रेसची 55 वर्षांची राजवट तसेच आमच्या 5 वर्षांच्या शासनाचा हिशेब घेऊन मैदानात उतरण्याचे आव्हान देतो. भाजपने विकासाची गंगा आदिवासी तसेच दलित समाजाच्या घरात पोहोचविण्याचे काम केल्याचा दावा शाह यांनी केला आहे.

झारखंडची घौडदौड

काश्मीर भारताचा अविभाज्य भाग व्हावा तसेच दहशतवाद, नक्षलवादाचा खात्मा व्हावा अशी झारखंडची इच्छा होती. अयोध्येत भगवान रामाचे मंदिर उभारले जावे असे झारखंड इच्छितो. झारखंडच्या जनतेने अनेक सरकारे पाहिली, अनेक पक्षांची राजवट अनुभवली, पण येथील जनतेने विकास पाहिला नाही, कारण कुठलेच सरकार पूर्ण बहुमताचे नव्हते. 2014 मध्ये पूर्ण बहुमतासह भाजपचे रघुवर दास मुख्यमंत्री झाले आणि झारखंड विकासाच्या मार्गावर घौडदौड करू लागला. भाजप सरकारने आदिवासींच्या बळजबरीच्या धर्मांतराला रोखण्यासाठी कायदा आणल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हेमंत सोरेन लक्ष्य

शिबू सोरेन आणि भाजप स्वतंत्र राज्यासाठी आंदोलन करत असताना झारखंडच्या तरुण-तरुणींवर गोळय़ा चालविणारे तसेच लाठीमार करणारे कोण होते अशी विचारणा हेमंत सोरेन यांना करू इच्छितो. काँग्रेस पक्षच या सर्व अत्याचारांमागे होता आणि आज सत्तेच्या लालसेपोटी हेमंत सोरेन काँग्रेसच्या मांडीवर बसून मतांची याचना करत असल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.

राममंदिराचा उल्लेख

रामजन्मभूमी प्रकरणी खटला चालविण्याची गरज नसल्याचे काँग्रेस नेते सर्वोच्च न्यायालयात बोलत होते. पण आम्ही खटला चालावा यासाठी आग्रह कायम धरल्याने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असून आता अयोध्येत राम मंदिराची उभारणी होणार असल्याचे शाह म्हणाले.

Related posts: