|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आंबेओहोळचे काम धरणग्रस्तांनी बंद पाडले

आंबेओहोळचे काम धरणग्रस्तांनी बंद पाडले 

प्रतिनिधी  / आजरा

आंबेओहोळ धरणाचे काम सुरू करण्याच्या इराद्याने धरणाच्या साईटवर यंत्रसामग्री दाखल झाली. ही माहिती मिळताच धरणग्रस्तांनी धरण साईटवर धाव घेत पुनर्वसनाचे काम झाल्याखेरीज काम सुरू करू देणार नाही अशी भूमिका घेत धरणाचे काम बंद पाडले. धरणग्रस्तांचे संपूर्ण पुनर्वसन होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत धरणाचे काम सुरू करू देणार नाही अशी भूमिका धरणग्रस्तांनी घेतली. 

धरणाच्या काम करीत असलेल्या ठेकेदाराने धरणाचे उर्वरीत काम सुरू करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू केले होते. धरणाच्या कामासाठी धरणसाईटवर मशिनरी आणल्याची माहिती मिळताच आर्दाळ, कर्पेवाडी, होन्याळी व हालेवाडी येथील धरणग्रस्तांनी धरणसाईटवर धाव घेतली. धरणाच्या कामासाठी यापूर्वी ज्या शेतकऱयांनी अल्प मोबदला घेऊन जमीन दिल्या त्या धरणग्रस्त शेतकऱयांची 65 टक्के रक्कम भरून घेऊन पर्यायी जमीनी देण्यात याव्यात. किंवा या शेतकऱयांचा विशेष आर्थिक पॅकेजमध्ये समावेश करून त्यांना एकरी 14 लाख 40 हजार रूयांप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

याबरोबरच संकलन रजिस्टर तातडीने दुरूस्त करावे तसेच अधिकाऱयांकडून धरणग्रस्तांना चुकीची माहिती देणे, कायद्याचा धाक दाखवून भिती घालण्याचे प्रकार बंद करावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या रखडलेल्या प्रश्नांबाबत अधिकाऱयांना वारंवार संपर्क साधूनही अधिकाऱयांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप हालेवाडी येथील धरणग्रस्त संजय येजरे यांनी केला. तर अनेकवेळा मागणी करून शासनाकडून धरणग्रस्तांना न्याय मिळाला नसल्याचा आरोप आर्दाळ येथील शंकर पावले यांनी केला. शेतकऱयांसाठी धरणाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे, पण त्यापूर्वी एकाही धरणग्रस्तावर अन्याय होता कामा नये यासाठी शासनाने जबाबदारी घेण्याची गरज आहे. असल्याचेही पावले यांनी सांगितले.

पुनर्वसनाचे प्रश्न संपल्याशिवाय धरणाचे काम सुरू करू न देण्याचा निर्धार धरणग्रस्तांनी केला. यावेळी प्रकाश पाटील, भैरू गुरव, मधू पुंडपळ, पांडूरंग पाटील यांच्यासह आर्दाळ, कर्पेवाडी, होन्याळी व हालेवाडी आदि गावातील शेकडो धरणग्रस्त उपस्थित होते

Related posts: