|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मसोलीत हत्तीकडून भात पिक व गवत गंजीचे नुकसान

मसोलीत हत्तीकडून भात पिक व गवत गंजीचे नुकसान 

प्रतिनिधी / आजरा

गेल्या पाच दिवसांपासून मसोली परीसरात तळ ठोकलेल्या हत्तीने परीसरात धुमाकूळ घातला आहे. रविवार दि. 1 डिसेंबर रोजीच्या रात्री मसोलीतील पाझरी तसेच सिम नावाच्या शेतात भात पिकाचे मोठे नुकसान केले. शिवाय भात मळून रचून ठेवण्यात आलेल्या गवताच्या गंजीचेही नुकसान केले आहे. गवत गंजी विस्कटून टाकल्याने शेतकऱयांच्या जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हत्तीच्या सततच्या वावरामुळे शेतकरी हैराण झाला आहे. खानापूर तलाव, बोंडगीचा घाणा, पोलीसांची तळी परीसरात हत्ती गेल्या चार-पाच दिवसांपासून तळ ठोकून आहे. दिवसभर चाळोबा जंगलात स्थिरावणारा हत्ती सायंकाळी या परीसरात उतरत आहे. रविवारी रात्री मसोली येथील मारूती कांबळे (एम. आर) यांच्या शेतातील घनसाळसह इतर वाणांच्या भाताचे नुकसान केले. शेतात असलेल्या दलदलीमुळे वाहने घेऊन जाणे अडचणीचे असल्याने कापलेले भात तसेच गवत त्याच ठिकाणी ठेवण्यात आले होते. हत्तीने भातासह गवताचे नुकसान केले.

रविवारी कांबळे कुटुंबिय भात कापणी करून शेतातच रचून 6.30 वाजण्याच्या सुमारास घरी परतत होत. याच दरम्यान जंगलातून हत्तीने कांबळे यांच्या शेतात प्रवेश केला. अचानक शेतात आलेला हत्ती पाहून एम. आर. कांबळे यांच्यासह निवृत्ती कांबळे, जयसिंग कांबळे, प्रदीप कांबळे यांची पाचावर धारण बसली. प्रसंगावधना राखत त्यांनी आरडाओरड करीत हत्तीला हुसकाविण्याचा प्रयत्न केला. मात्र हत्ती त्यांच्याच दिशेने चाल करून आल्याने त्यांनी गावच्या दिशेने पळ काढला. तर हत्तीने कापणी करून रचून ठेवलेले भात शेतात विस्कटून टाकले.

याच दरम्यान सुधाकर होडगे रायवाडय़ाकडून मसोलीकडे येत होते. त्यांचा मार्ग हत्तीने अडवून धरला. होडगे यांनी प्रसंगावधान राखत माघारी फिरून हत्ती रस्ता ओलांडून जाण्याची वाट पाहत थांबले. हत्ती मार्ग ओलांडून गेल्यानंतर त्यांनी गावच्या दिशेने कूच केली. दिवसभर जंगलात थांबून राहणारा हत्ती रात्री शेतात घुसून पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वनविभागाने या हत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

Related posts: