|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ढगाळ वातावरणाने द्राक्षबागायतदारांना धडकी

ढगाळ वातावरणाने द्राक्षबागायतदारांना धडकी 

प्रतिनिधी / सांगली

दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी, अवकाळी आणि आता पुन्हा खराब वातावरण यामुळे जिल्हय़ातील शेतकऱयांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हय़ात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या शिडकाव्याने पुन्हा एकदा द्राक्ष बागायतदार हबकले आहेत. फुलोऱयातील द्राक्ष बागायतदारांत चिंता वाढली आहे. हवामानाच्या अंदाजानुसार 5 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी, अवकाळीने शेतकरी उद्ध्वस्थ झाला आहे. खरीप आणि रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेले आहेत. डाळिंबाच्या बागाही धोक्यात आल्या आहेत. या नुकसानीतून शेतकरी सावरत असताना दोन दिवसापासून जिल्हय़ात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय काही भागात रिमझिम पाऊसही पडत आहे. यामुळे शेतकऱयांच्या उरात पुन्हा धडकी भरली आहे. याचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे.

मागास छाटणी घेतलेल्या बागा फुलोऱयात आहेत. गेले दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे चिंतेत भर पडली आहे. फुलगळ होऊ नये म्हणून तज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारण्या आणि ड्रीपद्वारे खतांचे नियोजन सुरु आहे. नोव्हेंबरमध्ये अवकाळीमुळे फवारण्याही करता येत नव्हत्या. सध्या फवारणीसाठी तरी वातावरण चांगले आहे. याचा काय तो शेतकऱयांना फायदा होत आहे. जिह्यातील दीड लाखावर एकर द्राक्ष शेती असली तरी त्यातील 45 टक्के बागा यापूर्वीच विविध कारणांनी शेतकऱयांनी सोडून दिल्या आहेत. आता फुलोऱयांतील 30 टक्के बागा जगवण्यासाठी धडपड सुरु झालेली आहे.

ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने तालुक्यात पुन्हा धुमाकूळ घातल्याने द्राक्षपीक संकटात होते. फुलोऱयातील द्राक्षाची मणी गळती, रोगाचा प्रादुर्भावाने रात्रंदिवस औषध फवारणी करावी लागली होती. तरीही पावसाने ती धुवून गेल्याने आर्थिक संकट उभे राहिले. द्राक्षबागांची मुळी सुरु करण्यासाठी शेतकऱयांना एकरी पाच हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला होता. यामुळे काही शेतकऱयांनी द्राक्षबागेवर कुऱहाड चालवली होती. बदलत्या वातावरणामुळे द्राक्षांसह बेदाणा उत्पादनात घटणार आहे. निर्यातही कमी होणार आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्हय़ातील शेतकरी मात्र चिंतेत सापडला आहे.

Related posts: