|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शाळकरी मुलाबरोबर अनैसर्गिक कृत्य

शाळकरी मुलाबरोबर अनैसर्गिक कृत्य 

प्रतिनिधी / इस्लामपूर

कापूसखेड (ता. वाळवा) येथील 13 वर्षीय शाळकरी मुलासोबत गावातीलच दोघांनी अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या मुलाने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर काही ग्रामस्थांनी दोघा संशयितांना बेदम चोप दिला. दोघांनाही इस्लामपूर पोलिसांनी अटक केली असून त्यांना शुक्रवार 6 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

पुष्पक प्रकाश नायकवडी (वय 21), ओंकार सुभाष पाटील (वय 19) अशी संशयितांची नावे आहेत. अत्याचारीत मुलगा शेतमजूर कुटुंबातील आहे. हे दोघेजण रविवारी सायंकाळी मोटारसायकलवरुन संबंधीत मुलाच्या घरी गेले. त्यावेळी या दोघांनी त्याच्या आजीस त्याला गावात घेऊन जातो, असे सांगून नेले.  आरोपींनी त्यास सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास कापूसखेड हद्दीतील एका उसाच्या शेतात व दिलीप जाधव यांच्या मोकळया शेडमध्ये नेले. नायकवडी व पाटील या दोघांनी त्यास ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले.

रात्री हा मुलगा घरी अल्यानंतर त्याच्यावर अत्याचार झाल्याची माहिती त्याची आई व पुटुंबीयांना समजली. या अनैसर्गिक कृत्यामुळे त्याला इजा झाली होती. त्यामुळे कुटुंबीय व परिसरातील लोकांतून संताप व्यक्त झाला. त्यांनी संशयित आरोपींना शोधून काढून बेदम चोप दिला.

दरम्यान, अशा विकृत प्रकरणातही राजकारण घुसले. गावातीलच काहींनी हा प्रकार स्थानिक पातळीवर मिटवण्याचा प्रयत्न केला. पण, मुलाच्या आईने अक्रमक भूमिका घेतली. मध्यस्थी करणारांचा ‘तुमच्या मुलांच्या बाबतीत असा प्रकार झाला असता, तर काय केले असते’, असा जाब विचारुन थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. आईनेच या प्रकरणी फिर्याद दिली.

पोलिसांनी या दोघांविरुद्ध 377, 506, 34, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 चे कलम 4, 8, 12 अन्वये गुन्हा नोंद केला. रात्री उशिरा संशयितांना अटक केली. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने शुक्रवारपर्यंत कोठडी दिली. या घटनेमुळे कापूसखेड गावात संताप व्यक्त होत असून विकृतांना कठोर शासन व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ करीत आहेत.

यापूर्वीही असा प्रकार

  नायकवडी व पाटील हे विकृत मनोवृत्तीचे आहेत. त्यांनी यापूर्वीही ही धमकी देऊन असे कृत्य केल्याची चर्चा आहे. रविवारी हा प्रकार घडल्यानंतर व अत्याचारी मुलाने त्याबाबत सांगितल्यानंतर जमाव संतप्त झाला. त्यांनी त्यांची शोधाशोध सुरु केल्यानंतर ते दोघे घरी चालत येत असताना जमावाच्या हाती लागले.

Related posts: