|Friday, December 13, 2019
You are here: Home » क्रिडा » नेपाळच्या अंजलीचा नवा विश्वविक्रम

नेपाळच्या अंजलीचा नवा विश्वविक्रम 

महिला टी-20 सामन्यात मिळविले 0 धावांत 6 बळी, नेपाळ 5 चेंडूत विजयी

वृत्तसंस्था/ पोखरा, नेपाळ

नेपाळच्या अंजली चंदाने महिलांच्या टी-20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास निर्माण करताना सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. येथे सुरू असलेल्या 13 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील मालदिवविरुद्धच्या सामन्यात तिने एकही धाव न देता तब्बल 6 बळी मिळविले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात एकही धाव न देता सहा बळी मिळविण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे अंजलीचा हा पदार्पणाचा सामना होता.

नेपाळने हा सामना 10 गडय़ांनी जिंकला. त्यांना विजयासाठी केवळ 17 धावा करण्याची गरज होती आणि पहिल्या पाच चेंडूतच त्यांनी हे उद्दिष्ट गाठले. यापूर्वी कमी धावांत 6 बळी टिपण्याचा विक्रम मलेशियाच्या मॅस एलीसाने नोंदवला होता. याच वर्षी जानेवारीत चीनविरुद्ध झालेल्या सामन्यात तिने 3 धावांत 6 बळी मिळविले होते. 24 वर्षीय अंजलीने सहा महिला फलंदाजांना 2.1 षटकांत शून्य धावांवर बाद केले. मालदिवने प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर त्यांचा संघ 10.1 षटकांत केवळ 16 धावांतच गारद झाला. करुणा भंडारीने 4 धावांत 2 बळी घेतल् अंजलीला चांगली साथ दिली तर दोघी धावचीत झाल्या. मालदिवच्या आठ जणींना खाते उघडता आले नाही तर दोघींनी एकेरी धावा जमविल्या. नेपाळच्या सलामीवीर काजल श्रेष्ठने नाबाद 13 धावा केल्या आणि त्यांना अवांतर धावा मिळाल्या.

मात्र नेपाळचा हा दुसऱया क्रमांकाचा सर्वात जलद विजय ठरला. याआधी जुलै 2019 मध्ये रवांडा-टांझानिया यांनी माली संघावर केवळ 4 चेंडूत विजय मिळविला होता.

Related posts: