|Friday, December 13, 2019
You are here: Home » क्रिडा » महिला बॉक्सर नीरज निलंबित

महिला बॉक्सर नीरज निलंबित 

उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने तात्पुरती कारवाई, सुनावणीनंतर अंतिम निर्णय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय पदकविजेती महिला बॉक्सर नीरज फोगट (5ाdन7 किलो गट) उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने तिच्यावर तात्पुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुढील वर्षी होणाऱया टोकियो ऑलिम्पिकसाठी संभाव्य खेळाडूंत तिला निवडण्यात आले होते.

हरियाणाची ही बॉक्सर लिगॅन्ड्रॉल व अन्य स्टीरॉइड्स घेतल्याचे उत्तेजक चाचणीत आढळून आले. माजी राष्ट्रीय पदकविजेत्या असलेल्या नीरजने बल्गेरियात झालेल्या स्ट्रँडा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते तर या वर्षी रशियात झालेल्या एका स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळविले होते. याशिवाय यावर्षी गुवाहाटीत झालेल्या इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेतही तिने सुवर्णपदक मिळविले आहे. 24 सप्टेंबर रोजी तिने नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्याची कतारमधील उत्तेजकविरोधी प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल त्यांनी याच महिन्यात भारतीय संघटनेकडे पाठविला होता.

‘कतार लॅबकडून मिळालेल्या अहवालानुसार नीरजने एलजीडी 4033 व अन्य ऍनाबोलिक द्रव्ये घेतल्याचे स्पष्ट झाले आहे,’ असे राष्ट्रीय उत्तेजकविरोधी एजन्सीने (नाडा) सांगितले. याबाबत तिला नोटिस जारी करण्यात आली असून नाडाचा नियमभंग केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. तसेच तिच्यावर तात्पुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे तिला कळविण्यात आले आहे. 13 नोव्हेंबरपासून तिचा निलंबनाचा कालावधी सुरू झाला असल्याचेही नाडाने सांगितले. नीरजने अहवाल मान्य केला असून तिने दुसऱयांदा चाचणी करण्यासाठी ब नमुना देण्यास नकार दिला आहे.

तिच्या विनंतीवरून हे प्रकरण उत्तेजकविरोधी शिस्तपालन समितीकडे सुनावणीसाठी पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाची माहिती भारतीय बॉक्सिंग फेडरेशनला (बीएफआय) गेल्या आठवडय़ात कळविण्यात आली असल्याचेही नाडाने स्पष्ट केले. ‘आम्हाला गेल्या आठवडय़ात या घडामोडीची माहिती मिळाली. तिच्यावर सध्या तरी कोणती कारवाई करण्यात आलेली नसली तरी राष्ट्रीय शिबिरातून तिने सुटीची मागणी केली होती. सध्या ती कुठे आहे, त्याची आम्हाला माहिती नाही,’ असे फेडरेशनच्या पदाधिकाऱयाने सांगितले.

रशियात अलीकडेच झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. पण तेथे तिला प्राथमिक फेरीतूनच स्पर्धेबाहेर पडावे लागले होते. क्रीडा मंत्रालयाने टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप) योजनेत गेल्या सप्टेंबरमध्येच 24 वर्षीय नीरजचा समावेश केला होता. एकूण आठ बॉक्सर्सना या योजनेत सामील करून घेण्यात आले आहे. त्यापैकी नीरज एक बॉक्सर होती.

Related posts: