|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सेवाभावी ब्राम्हण पतसंस्थेचा मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद!

सेवाभावी ब्राम्हण पतसंस्थेचा मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद! 

2018 मध्ये 11 कोटी 72 लाखाचा केला होता अपहार

चिपळूण

बहुचर्चित ठरलेल्या शहरातील सेवाभावी ब्राम्हण नागरी सहकारी पतसंस्थेत 11 कोटी 72 लाखाचा अपहार करून फरारी झालेल्या मुख्य सूत्रधाराला अखेर रविवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेत अटक केली. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून गाजत असलेल्या या अपहार प्रकरणावर प्रकाश पडणार आहे.

राजेंद्र वसंत लोवलेकर (पारिजात सोसायटी, मार्कंडी-चिपळूण) असे अटक केलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. या बाबतची फिर्याद प्रकाश काणे (चिपळूण) यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, लोवलेकर हा सेवाभावी ब्राम्हण नागरी सहकारी पतसंस्थेत व्यवस्थापक या पदावर कार्यरत होता. 2018मध्ये त्याने पतसंस्थेतील बोगस कर्जखाते व खोटय़ा सह्या तसेच पिग्मी खात्यावरील रक्कम ठेवीदरांकडून स्वीकारुन ती रक्कम पतसंस्थेत जमा न करता यातूनच त्याने 2018मध्ये एकूण 11 कोटी 72 लाख इतक्या रक्कमेचा अपहार केला होता. त्यानंतर हा प्रकार लक्षात येताच चेअरमन काणे यांनी या अपहाराबाबतची येथील पोलीस स्थानकात तक्रार दिली. त्यानुसार लोवलेकर याच्यावर 31 जानेवारी 2018 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर लोवलेकर हा गेल्या दोन वर्षापासून येथून बेपत्ता झाला होता. या प्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. इतकेच नव्हे तर आपण पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून त्याने आपल्या कुटुंबाशीही संपर्क ठेवला नव्हता.

लोवलेकर याचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक विशेष पथक तयार करुन ते लोवलेकर याच्या शोधासाठी पुणे तसेच मुंबई या ठिकाणी पाठवण्यात आले होते. या पथकाच्या कौशल्यपूर्ण शोधाने लोवलेकर यास रविवारी जेरबंद करण्यात यश आले. दरम्यान, लोवलेकर यास सोमवारी न्यायालयात हजर केले असता 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या बाबतचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गिरीष सासने, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल संदीप कोळंबेकर, शांताराम झोरे, विजय आंबेकर, दत्ता कांबळे आदींच्या पथकाने केली.

Related posts: