|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गुहागर आगार सर्वोत्तम कामगिरीत राज्यात प्रथम!

गुहागर आगार सर्वोत्तम कामगिरीत राज्यात प्रथम! 

गुहागर आगाराची एकाच वर्षात दुसरी कामगिरी

प्रशांत चव्हाण/ गुहागर

उत्पन्न, डिझेलची बचत, देखभाल दुरुस्ती व कमी तांत्रिक खर्च आदींमध्ये गुहागर एसटी आगाराला 85.47 इतकी सर्वाधिक श्रेणी प्राप्त झाली आहे. हे आगार राज्यामध्ये अव्वल ठरले असल्याचे आगार व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार समोर आले आहे. विशेष म्हणजे जिह्यात मध्यवर्ती स्थानक म्हणून ओळखले जाणारे चिपळूण आगार 51 व्या (74.23 श्रेणी), तर रत्नागिरी आगार 148व्या (60.01 श्रेणी) क्रमांकावर आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून आगारांच्या सेवेबाबत व त्यांच्या अन्य चालणाऱया कामगिरीबाबत लेखाजोगा मांडण्यात आला आहे. दरवर्षी याचा आढावा घेतला जातो. यामध्ये हंगामी चालवण्यात येणाऱया गाडय़ा, त्यांचे उत्पन्न, देखभाल दुरुस्ती, दुरुस्तीसाठी लागणारे विविध प्रकारचे पार्ट, टायर, डिझेल बचत यांची माहिती घेऊन त्याप्रमाणे प्रत्येक आगाराची ग्रेड (श्रेणी) ठरवली जाते. या सर्वच श्रेणीत राज्यात गुहागर आगाराने बाजी मारली आहे.

  जिल्हय़ातील इतर आगारांचा श्रेणीनिहाय क्रमांक

85 व्या क्रमांकावर असलेल्या दापोली आगाराने 69.72, 55 व्या क्रमांकावर असलेल्या मंडणगडने 73.49, 144 व्या क्रमांकावर असलेल्या खेडने 60.22, 205 व्या क्रमांकावर असलेल्या देवरुखने 52.39, 57 व्या क्रमांकावर असलेल्या राजापूरने 73.16, तर 240 व्या क्रमांकावर असलेल्या लांजा आगाराने 44.31 असे गुण मिळवले आहेत.

गुहागर आगारात 75 साध्या, 2 मिनी अशा एकूण 77 गाडय़ा आहेत. विशेष म्हणजे या आगाराला 6 शिवशाही बसेस मिळाल्या होत्या. मात्र  धोकादायक बंद असलेल्या मोडकाघर पुलामुळे त्या 5 महिन्यांपूर्वी रत्नागिरीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगाराच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तरीही आगाराने चांगली कामगिरी बजावली आहे. वेळापत्रकाची नियोजनबध्द मांडणी करुन व प्रवाशांची कोणतीही गैरसोय न करता योग्य सेवा देण्यात येथील आगार व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक, कार्यशाळा तंत्रज्ञ यशस्वी ठरले आहेत. ग्रामीण तालुका असूनही गुहागर आगाराने विशेष कामगिरी केल्याबद्दल रत्नागिरी विभागीय नियंत्रक व अन्य अधिकाऱयांनी या आगाराचे व्यवस्थापक व अधिकारी, कर्मचाऱयांचे विशेष अभिनंदन केले आहे.

 सर्वाधिक उत्पन्न मिळवून रत्नागिरी विभागात प्रथम

एसटी महामंडळाच्या मुंबई प्रादेशिक विभागामध्ये गुहागर आगाराने याचवर्षी उत्पन्न वाढीत 46 लाख 77 हजाराचे उत्पन्न मिळवून रत्नागिरी विभागात प्रथम क्रमांक मिळवला होता. गुहागर आगाराच्या गाडय़ा वेळेवर सुटणे, एखाद्या तक्रारीची दखल घेऊन ती सोडवणे, कार्यशाळेत आलेल्या गाडय़ांची वेळेवर दुरुस्ती करणे, आगारातील सर्वच विभागातील कामकाजावर जातीने लक्ष ठेवणे आदींमुळे आगाराचा दर्जा सुधारला आहे.  

 यशामध्ये आगारासह प्रवाशांचा मोलाचा वाटा

गुहागर आगाराने यावर्षी उत्पन्नवाढीत यश मिळवले. पाठोपाठ राज्यात सर्वच कामगिरीत अव्वल श्रेणी मिळवली आहे. आगारातील सर्व अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक, तंत्रज्ञ यांच्याबरोबरच प्रवाशांचाही तितकाच मोलाचा वाटा आहे. आगारामध्ये सर्व प्रकारच्या सुधारणा घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

-वैभव कांबळे, आगार व्यवस्थापक गुहागर.

 

 

Related posts: