|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » टोलबंदीबाबत दोन्ही राजांच्या भूमिकेकडे सातारकरांचे लक्ष

टोलबंदीबाबत दोन्ही राजांच्या भूमिकेकडे सातारकरांचे लक्ष 

आंदोलन सुरुच ठेवण्याची टोलविरोधकांची भूमिका

प्रतिनिधी/ सातारा

प्रचंड खराब महामार्ग, असंख्य खड्डे आणि त्यातून प्रवास करताना सातारकरांची होणारे हाल, वाहनांचे झालेले अपघात आणि त्या अपघातात गेलेले बळी यामुळे पेटलेल्या सातारकरांनी विधायक मार्गाने टोलविरोधी चळवळ सुरु केली. सातारकरांच्या लोकभावनेची दखल घेत टोलविरोधी आंदोलन उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील उडी घेतली. त्यांनी 15 दिवसांची मुदत रस्ते दुरुस्तीसाठी दिली होती, ती संपत असून अद्याप महामार्गाची अवस्था तशीच असल्याने आता दोन्ही राजेंच्या अल्टिमेटमनुसार टोल बंद होणार का? याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, टोल बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार टोलविरोधी चळवळीने केला आहे.

  सातारा जिह्यातून सुमारे 125 किलोमीटरचा आशियाई महामार्ग जातो. या महामार्गावर दोन टोलनाके आहेत. हे दोन्हीही टोलनाके बंद करण्यासाठी सातारकरांची चळवळ उभी राहिली आहे. रस्ते विकास प्राधिकरणासह जिह्यातील लोकप्रतिनिधींनाही निवेदने देवून झालेली आहेत. महामार्गाचे खड्डे बुजवा, टोल नाका बंद करा, असा नारा देत चळवळ वाढू लागल्याने आणि ती रस्त्यावर उतरु लागल्याने उदयनराजेंनी आणि आमदार शिवेंद्रराजेंनीही टोलनाका बंद करण्यासाठी मुदत दिली होती. दोन्ही राजांनी दिलेल्या अल्टिमेटमची मुदत संपली आहे. मुदत संपत असल्याने त्याच दिवशी टोल विरोधक चळवळीचे कार्यकर्ते पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असून टोल नाका बंद पाडण्याच्या निर्धारावर सर्वजण ठाम आहेत.

राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होण्यापूर्वी पारगाव खंडाळा येथे टोलनाका होता. चौपदरीकरण झाल्यानंतर तो टोलनाका आनेवाडी गावच्या हद्दीत आणण्यात आला. सातारा जिह्यात चौपदकरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. उड्डाणपूल, सेवा रस्ते यामध्ये ठेकदार मालामाल झाला आहे तर सर्वसामान्य शेतकरी ज्यांची जमिनी गेली तो कंगाल झाला आहे. अजूनही त्याच्या पुढचा कहर म्हणजे पुन्हा सहा पदरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्या कामामध्येही गडबड घोटाळा होत आहे. डांबराच्या रस्त्याऐवजी सिमेंटचे रस्ते केलेले असून सिमेंटच्या रस्त्यांना साईडपट्टी धोक्कादायक आहेत. पडलेले खड्डे फुटाफुटाचे आहेत. टायरांबरोबरच रिमाही गाडयांच्या जावू लागले आहेत.

कित्येक निरापराध लोकांचे जीव गेले आहेत. असे होत असताना महामार्ग प्राधिकरण मात्र यावर कोणतेही उपाययोजना करत नाही. दररोज जीव जात असताना टोल वसुली थांबत नाही. अव्वाच्या सव्वा टोल घेतला जात आहे. आनेवाडी आणि तासवडे हे दोन्ही टोलनाके बंद करण्यात यावेत या मागणीसाठी गेल्या काही महिन्यापासून चळवळ सुरु आहे. सोशल मीडियावरची चळवळ प्रत्यक्षात रस्त्यावर उतरली आहे. त्यांनी खासदार श्रीनिवास पाटील, शरद पवार, नितीन गडकरी, शिवेंद्रराजे यांना निवेदने दिली होती. त्यानुसार उदयनराजेंनी दि.1 रोजी टोलनाका बंद करु असा इशारा दिला होता. तर आमदार शिवेंद्रराजेंनी दि.4 रोजी टोलनाका बंद करण्याचा इशारा दिला होता. उदयनराजेंनीही टोलनाका बंद केला नाही. त्यामुळे आता आमदार शिवेंद्रराजेंनी दिलेला अल्टीमेटम तरी पाळला जाणार काय?, त्या दिवशी शिवेंद्रराजे नेमकी काय भूमिका घेणार याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. दरम्यान, सातारा जिह्यातील टोलनाक्यांबाबत शिवेंद्रराजेंनीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवुन त्यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, टोल विरोधी कृती समितीनेही आमदार शिवेंद्रराजे यांच्या अल्टिमेटलचीच वाट पहात थांबले आहेत. त्यांच्याकडून काय होते त्यावर नेमके काय होईल हे पाहिले जात आहे. 

टोल बंद करण्यास भाग पाडण्याचा निर्धार

आमदार शिवेंद्रराजे यांनी दि. 4 रोजी अल्टिमेटम दिला होता. त्या अल्टिमेटमच्या दिवशीच ते काय करतात ते पाहणार आहोत. कोणत्याही हिसंक पद्धतीने आंदोलन न करता शांततेच्या मार्गाने आंदोलन केले जाईल. परंतु सातारकरांचा टोल माफ करण्यासाठी आम्ही भाग पाडू. जो पर्यंत शासन लक्ष देत नाही. तोपर्यत आंदोलन सुरुच राहणार आहे, असे टोल विरोधी चळवळीचे महेश पवार यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.

Related posts: