|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » डिचोलीत देवी शांतादुर्गेच्या नवा सोमवार उत्सवास प्रारंभ

डिचोलीत देवी शांतादुर्गेच्या नवा सोमवार उत्सवास प्रारंभ 

सर्वत्र चैतन्यदायी वातावरण, भाविकांची अलोट गर्दी

डिचोली/प्रतिनिधी

   डिचोलीच्या देवी शांतादुर्गेच्या प्रसिध्द नवा सोमवार उत्सवास काल सोमवारी मोठय़ा थाटात प्रारंभ झाला. मोठय़ा संख्येने भाविकांचा महापूर डिचोलीत दिसून आला. रात्री गावकरवाडा डिचोली येथील देवीच्या मंदिरातील व आतीलपेठ येथील मठमंदिरातील देवीची पालखी वाजत गाजत मिरवणुकीने निघाल्या. दोन्ही ठिकाणी प्रसिद्ध गायक कलाकारांचे गायन रंगले. आज मंगळवारी दोन्ही पालख्या आपापल्या आधिस्थानात दाखल झाल्यानंतर या उत्सवाची सांगता होणार आहे.

   गावकरवाडा डिचोली येथील श्री शांतादुर्गा मंदिरात सकाळी देवीला महाभिषेक व विविध धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर भाविकांकडून रात्री उशिरापर्यंत देवीची भक्तीरूपाने सेवा करण्यात आली. रात्री सर्व भक्तजनांच्या उपस्थितीत देवीला गाऱहाणे घालून मोठय़ा नामघोषाने व दत्तप्रसाद भजनी मंडळ वेंगुर्ला तसेच हनुमान बँड पथक यांच्या संगतीने व दारूकामाच्या आतषबाजीने पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. पालखी मंदिरासमोरील कोमुनिदाद सभामंडपात ठेवण्यात आली असता मोठय़ा प्रमाणात भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.

 नामवंत कलाकारांच्या रंगल्या मैफली

   त्यानंतर श्री देवी शांतादुर्गेच्या प्रांगणात मराठी सारेगमप हा गायनाचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यात सुप्रसिद्ध गायिका सारेगमप प्रथम विजेते गायिका वैशाली माडे, (माडे), प्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी (मुंबई) यांनी एकापेक्षा एक अशी गीते सादर करून मैफलीत रंगत आणली. या कार्यक्रमाचे निवेदन डॉ. समिरा गुजर यांनी केले. पहाटे देव रवळनाथ मंदिराच्या प्रांगणात नवनाटय़धारा यांची नाटय़गीत व शास्त्रीय संगीताची बहारदार मैफल रंगली. त्यात गायक डॉ. रामा देशपांडे, गायिका कल्याणी साळुंखे हे कला सादर केली. या कार्यक्रमाचे निवेदन रामा केळकर यांनी केले.

  आतीलपेठ डिचोली येथील मठमंदिरात श्री शांतादुर्गा देवस्थान व नवा सोमवार उत्सव समितीतर्फे बाजारकर मंडळातर्फे साजरा होणारा नवा उत्सव यावषी आतील पेठ दहाजण मंडळातर्फे साजरा करण्यात आला. सकाळी मठमंदिरात विविध धार्मिक विधी झाल्या. दुपारी, आरती व महाप्रसाद झाला.

 संध्याकाळी पालखी मिरवणूक सुरु

   संध्याकाळी 7 वा.च्या सुमारास देवीची पालखी मठमंदिरातून बाहेर काढून लक्ष्मीनारायण मंदिराजवळ खास उभारलेल्या मंडपात ठेवण्यात आली. याठिकाणी स्थानिक कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री 10 वा.च्या सुमारास पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला.

     या उत्सवानिमित्त आतीलपेठ मठमंदिरात रात्री पहिली गायन मैफल झाली. त्यात प्रसिद्ध गायक डॉ. रामा पंडित (सूर नवा ध्यास नवा फेम) व सौ. सानिया पाटणकर यांनी आपली कला सादर केली. त्यांना तबल्यावर दत्तराज शेटय़े, संवादिनीवर दत्तराज सुर्लकर, पखवाजवर पवन वळवईकर व टाळ साथ राहुल खांडोळकर यांनी केली. या उत्सवाची दुसरी मैफल भायलीपेठ डिचोली येथील गुरूफंड ट्रस्ट येथे रात्री उशिरा संपन्न झाली. त्यात प्रसिद्ध गायक गणेश मेस्त्री (सा रे ग म फेम) व सौ. सिध्दी सुर्लकर पिळगावकर (संगीत सम्राट सितारा फेम) यांनी गायन कला सादर केली. त्यांना तबल्यावर तुकाराम गोवेकर, संवादिनीवर प्रसाद गावस, पखवाजवर महेंद्र च्यारी, टाळ साथ गोपाळ प्रभू यांनी केली. या कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन चिन्मय घैसास यांनी केले.

 डिचोली शहरातील आतीलपेठ, सोनारपेठ, सर्कलजवळील सर्व रस्ते दुतर्फा फेरीवाल्यांनी भरले आहेत. विविध प्रकारची खेळणी व इतर सामान या उत्सवात उपलब्ध झाले होते. सदर उत्सव कोणत्याही अनुचित प्रकाराविना पार पडावा यासाठी डिचोली पोलीस उपअधीक्षक गुरूदास गावडे, निरीक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक विजय राणे हे 

विविध प्रदर्शने, रांगोळी, गड किल्ले स्पर्धांचे आयोजन  

 या उत्सवानिमित्त राधाकृष्ण हायस्कूल, शांतादुर्गा हायस्कूल येथे विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कलाकृतींचे तसेच पर्यावरणीय, विज्ञान या विषयांवरील प्रदर्शने भरविण्यात आली होती. तसेच अयोध्या येथे गड किल्ले बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. मुलांनी साकारलेल्या किल्ल्यांचे दर्शन घेण्याची संधी लोकांना प्राप्त झाली. गावकरवाडा येथील शांतादुर्गा मंदिरासमोरील कोमुनिदाद सभामंडपात भव्य रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती. सदर एकापेक्षा एक अशी आकर्षक रांगोळी पाहण्याची संधी मंदिरात दर्शनासाठी येणाऱया भाविकांना मिळाली. तसेच रवळनाथ मंदिरात बाल रांगोळी कलाकार सिध्दांती अर्जुन परब हिने साकारलेल्या राजकीय विडंबनात्मक रांगोळीला अनेकांनी वाहवा दिली.

 

Related posts: