|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जादा दुधाची खरेदी रितसर, कोणताही घोटाळा नाही

जादा दुधाची खरेदी रितसर, कोणताही घोटाळा नाही 

गोवा डेअरीचे प्रशासक अरविंद खुंटकर यांचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी/ पणजी

दरवर्षी पर्यटन मौसमात दुधाची गरज वाढते आणि त्यामुळेच जादा दूध घ्यावे लागते. यावर्षी नोव्हेंबरमध्ये तीन दिवस जादा दूध बाहेरुन आणले. त्यासाठीची प्रक्रिया करण्यात येऊन त्यानंतरच दूध आणण्यात आले असून त्यात कोणताही घोटाळा झालेला नाही, असे गोवा डेअरीने कळविले आहे.

वृत्तपत्रातील बातमीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा डेअरीचे प्रशासक अरविंद खुंटकर आणि सहकार निबंधक मिनिनो डिसोझा यांच्या समवेत घेतलेल्या बैठकीत आढावा घेतला.

अनेक संस्थांकडून घेतले होते कोटेशन

त्यानंतर दै. ‘तरुण भारत’शी बोलताना अरविंद खुंटकर यांनी सांगितले की, दि. 25, 26 व 28 नोव्हेंबर अशा तीन दिवसांमध्ये मिळून 29693 लिटर दूध गोवा डेअरीने कोल्हापूरहून आणले. त्यासाठी गोवा डेअरीने एकूण 13 संस्थांकडून कोटेशन मिळविले होते. त्यातील काही दूध उत्पादक संस्थांनी प्रतिसाद दिला नाही. काहींचे दर खूपच महाग तर काहींनी अशक्य असल्याचे कळविले.

बेळगावहून सर्वांत कमी दरात दूध खरेदी

या संस्थांपैकी श्रीनिवास दूध, सांगली यांनी प्रतिलिटर रु. 37 तर बेळगावच्या हनुमान फुडसने 36.50 पैसे या सर्वात कमी दराने दूध देण्याचे मान्य केले असता त्यांनी तीन दिवसांमध्ये मिळून 29693 लिटर दूध दिले.

कोणत्याही गोंधळाविना दुधाची मागणी पूर्ण

दुधाची मागणी वाढल्यानंतर तेवढा दूध पुरवठा करणे आवश्यक असते. हा दूध पुरवठा गोवा डेअरीकडे व्हावा यासाठी आम्हाला अतिरिक्त दूध आणणे कम्रप्राप्त ठरले. त्यात कोणताही सावळा गोंधळ नाही. गोवा डेअरीने सर्व नियमांचे पालन करुनच दुधाचा तुटवडा कुठेही होऊ नये यासाठी आयत्यावेळी आलेली मागणी देखील पूर्ण केली असल्याचे अरविंद खुंटकर यांनी सांगितले.

अदिती कंपनीचा अनुभव, दर पाहूनच मक्याचे कंत्राट

मका खरेदीसाठी गोवा डेअरीने ई लिलाव दि. 16 नोव्हेंबर रोजी पुकारला होता.  त्यानंतर राज्य सरकारकडे मंजुरीसाठीही पाठविला होता. त्यात 5 कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यात सर्वात कमी दराची बोली अदिती कन्स्ट्रक्शन या कंपनीने लावली. या कंपनीने अनेक दुग्ध उत्पादक संस्थांना यापूर्वी मका पुरविला आहे. त्यामुळे सदर संस्थेचा अनुभव लक्षात घेऊन व परवडणारे दर लक्षात घेऊन गोवा सरकारच्या मान्यतेनंतरच या कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचे अरविंद खुंटकर म्हणाले.

गोवा डेअरीचे सर्व व्यवहार पारदर्शक व स्वच्छ असावेत यासाठी आपला प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

 

Related posts: