|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्रचार तोफा आज थंडावणार

प्रचार तोफा आज थंडावणार 

अथणी, कागवाड, गोकाक पोटनिवडणुकीत चुरस :  छुप्या प्रचाराला येणार गती : 5 रोजी मतदान तर 9 रोजी निकाल

वार्ताहर/ अथणी

राज्य सरकारचे भवितव्य ठरविणाऱया 15 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत गेल्या पंधरा दिवसात प्रचाराचा धुरळा उडाल्याचे पहायला मिळाले. राज्य पातळीवरील नेत्यांनी संबंधित मतदारसंघात ठाण मांडून जाहीर प्रचाराच्या माध्यमातून एकमेकांवर टीकास्त्र सोडले. जिल्हय़ातील गोकाक, अथणी आणि कागवाड मतदारसंघातही वरिष्ठ नेत्यांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यातून पोटनिवडणुकींचे वातावरण चांगलेच तापले आहे. आता मंगळवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. यानंतर छुप्या प्रचाराला गती येणार आहे.

पोटनिवडणुकीसाठी 11 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाली. 18 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. 21 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर अथणी विधानसभा मतदारसंघात 8, कागवाड विधानसभा मतदारसंघात 9 तर गोकाक विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवार पोटनिवडणुकीतून आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीच्या निकालावर राज्यातील सरकार तरणार की जाणार हे ठरणार असल्याने राज्य पातळीवरील भाजप, काँग्रेस व निजदच्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणास लावली आहे. यातून गेले 15 दिवस जाहीर प्रचाराच्या माध्यमातून नेत्यांनी राळ उठविली.

घराणेशाही, पक्षबदल प्रचाराचे मुख्य मुद्दे

राज्यात एकूण 15 मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्यापैकी जिल्हय़ात अथणी, कागवाड आणि गोकाक या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. गोकाक मतदारसंघात गेल्या पंधरा दिवसात विकासाऐवजी घराणेशाही तसेच पक्षबदल हेच मुद्दे प्रचारात वापरण्यात आले. तर अथणी मतदारसंघात पक्षबदलाबरोबर कोट्टलगी पाणीपुरवठा योजना, तलाव भरणी कार्यक्रम, महापूर स्थिती आदी मुद्दे उपस्थित करण्यात आले. तसेच कागवाड मतदारसंघात खिळेगाव बसवेश्वर पाणीपुरवठा योजना व ओला-सुका दुष्काळ या मुद्यांवर नेत्यांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडल्याचे पहायला मिळाले.

निवडणूक आयोग-पोलीस यंत्रणा सतर्क

आता मंगळवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर प्रचार थांबणार आहे. तत्पूर्वी ठिकठिकाणी सभा व रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शन होणार आहे. मंगळवारी सायंकाळी 5 नंतर छुप्या प्रचाराला गती येणार आहे. त्याचबरोबर पैसे वाटप तसेच अन्य अवैध प्रकार होण्याची शक्यता गृहीत धरून निवडणूक आयोग व पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

 

Related posts: