|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जन्मजात दिव्यंगत्वाला मात देत ’अजय’ घोडदौड

जन्मजात दिव्यंगत्वाला मात देत ’अजय’ घोडदौड 

स्नेहा मांगुरकर/कोल्हापूर

जन्मापासून जगण्याची खात्री नाही. डॉक्टरांनी मृत घोषिक केलं. अंत्यविधीची तयारी झाली. मात्र, तो जिवंत होता. तेव्हा त्याचा पाय हालला आणि तेथूनच त्याला पुन्हा रुग्णालयात हालवले. उपचार सुरू झाले आणि जणू त्याचा पुनर्जन्म झाला. जगण्याच्या संघर्षात ज्या पायांनी तो जिवंत असल्याची साक्ष दिली त्याच पायांनी त्याला जागतिक पातळीवर ओळख निर्माण करून दिली. ही प्रेरणादायी प्रवास आहे कसबा बावडा येथील अजय सखाराम वावरे याचा. आज जागतिक अपंग दिना निमित्त त्याच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल…

जगभरात 3 डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने सन 1992 पासून जागतिक स्तरावर हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. हा दिवस अपंग व्यक्तींच्या न्याय, हक्कांसाठी जनजागृती व्हावी, त्यांचा संघर्षमय प्रेरणादायी प्रवास त्यांची ओळख बनावी, त्यांना जगण्याची प्रेरणा मिळावी यासाठी साजरा केला जातो. जगभरात असे अनेक दिव्यांग आहेत ज्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर अपंगत्वावर मात करून जगात वेगळी ओळख निर्माण केली. असाच काहीसा प्रेरणादायी प्रवास राष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या धावपटू अजय वावरे याचा आहे.

अजयजा जन्म कसबा बावडय़ातील धनगर गल्लीत राहणाऱया वावरे कुटुंबात झाला. आई-वडील आणि भाऊ असं चौघांचं कुटूंब आहे. अजयच्या जन्मानंतरच शारीरिक स्थिती दूर्बलच होती. अशा अवस्थेत रुग्णालयत उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषिक केले. परंतु, अंत्यविधीची तयारी सुरू असताना त्याचा एक पाय हालला अन् जणू तो जिवंत असल्याची साक्ष मिळाली. पुन्हा त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र संकटे संपत नव्हती. 15 दिवसांतच त्याला पोलिओने ग्रासले. त्यात त्याला शारीरिक आणि काही प्रमाणात मानसिक अपंगत्व आले. अशा अवस्थेत त्याच्या आई-वडिलांनी हार मानली नाही तसेच उपचारात कोणतीही कसर सोडली नाही.

वावरे कुंटुंबाने अजयला जगवण्याची जिद्द सोडली नाही. मात्र संकटे त्यांची पाठ सोडायला तयार नव्हती. अशातच वडिल सखाराम वावरे यांचे अपघाती निधन झाले आणि सगळ्या कुटुंबाची जबाबदारी एकटय़ा आईवर येऊन पडली. अजयचे अपंगत्व आणि त्याच्या वडिलांचे अकाली निघून जाणे, या सगळ्या संकटांना मात देत आई कल्पना वावरे या जीवनाशी संघर्ष करत राहिल्या. त्यांनी धुणी-भांडी आणि स्वयंपाकाची कामं करून दोन्ही मुलांना मोठं केलं. एवढंच नाहीतर त्यांना शिकवण्याची जिद्दही सोडली नाही.

या सगळ्या संकटांचा सामना करत अजयचं प्राथमिक शिक्षण सुरू झाले. त्यातही त्याचे मतिमंदत्व आडवे येऊ लागले. अनेकांनी त्याला मतिमंदांसाठी असणाऱया शाळेत घालण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याच्या प्राथमिक शिक्षिका विजया स्वामी यांनी त्या गोष्टीला नकार देत. अजयला आपल्या शाळेतच शिकवण्याचा निश्चय केला. आपल्या शिक्षकांचा विश्वास अजयने सार्थ ठरवला. त्याने शालेय क्रीडा स्पर्धेत चुणूक दाखवली. त्यानंतर शिक्षिका विजया स्वामी यांनी आईला सांगून अजयचे नाव पॅराऑलिम्पिक असोसिएशनमध्ये नोंदवले.

अजय 8 वर्षांचा असल्यापासून पॅराऑलिम्पिक असोसिएशचने प्रशिक्षक देवदत्त माने यांच्याकडे सरावासाठी जाऊ लागला. तेथून खऱया अर्थाने त्याच्या ऍथलेटिक्समधील क्षमतांना वाव मिळाला. वालावलकर मैदानावर झालेल्या स्पर्धेत त्याची निवड यवतमाळ येथे होणाऱया पॅराऑलिम्पिकसाठी झाली. तिथे तो 100, 200 आणि 400 मीटर धावण्यात पहिला आला. यानंतर रत्नागिरी डेरवण येथे दाखवलेल्या कौशल्यावर भारतीय क्रीडा प्राधिकरण (स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडिया) येथे त्याची प्रशिक्षणासाठी निवड झाली. त्यानंतर तो नागपूर, भूवनेश्वर, दिल्ली, नाशिक, हरियाणा, पुणे याठिकाणी तो राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांत चमकला. त्याची ऍथलेटिक्समधील घोडदौड सुरू असून तो जागतिक स्तरावर खेळण्यासाठी प्रयत्नशील आहे.

ऍथलेटिक्समध्ये आपल्या कामगिरीने अनेकांना भूरळ घालत असणाऱया अजयचे शिक्षण मात्र थांबवावे लागले. जन्मताच पोलिओने काहीसे मतिमंदत्व आल्याने त्याला पुढील शिक्षण अशक्य झाले. दहावीनंतर त्याने पूर्णपणे धावण्यावरच लक्ष केंद्रित केले. जन्मापासून संकटांचे डोंगर कोसळले असले तरी अजयने आपल्या जिद्दीने आपले जगणे सुंदर केले आहे. त्याला आपल्या दिव्यंगत्वाचे कोणतेही शल्य नाही. या सगळ्या संघर्षानंतर त्याला मोठा नावलौकिकही मिळत आहे.

अजयच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत कोल्हापूर महानगरपालिकेसह अनेक सामाजिक संघटनांनी त्याचा गौरव केला आहे. तसेच त्याच्या जडण-घडणीचा महत्त्वाचा भाग असणाऱया त्याच्या आईलाही पुण्यातील एका सामाजिक संस्थेने आदर्श माता म्हणून गौरविले आहे. त्याच्या या प्रवासात त्याला अनेकांचे सहकार्य लाभले. जन्मजात संकटांसोबत दोन हात करत आणि सर्व समस्यांना मात देणारा अजय नावाप्रमाणाचे ’अजय’ आहे. त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा.

Related posts: