|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कोल्हापूर जिल्ह्यात 2 ते 8 डिसेंबर प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताह

कोल्हापूर जिल्ह्यात 2 ते 8 डिसेंबर प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताह 

प्रतिनिधी / कोल्हापूर

माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिने आणि महिलेला 5 हजार रूपयांचे 3 टप्प्यात सहाय्य देण्यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची सुरूवात करण्यात आली आहे. 2 ते 8 डिसेंबर जिल्ह्यामध्ये सप्ताह साजरा करण्यात येत असून गरोदर व स्तनदा मातांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी आज (दि. 3) पत्रकार परिषदेत केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहुल माने उपस्थित होते.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी या योजनेची माहिती दिली. गरोदर मातेने शासकीय आरोग्य संस्थेत गरोदरपणाची 100 दिवसांच्या आत नोंदणी केल्यानंतर 1 हजार इतका आर्थिक लाभ दिला जातो. दुसऱ्या टप्प्यात शासकीय अथवा खासगी रूग्णालयात किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेच्या 6 महिने पूर्ण झाल्यानंतर 2 हजार रूपयाचा लाभ दिला जातो.

तिसऱ्या टप्प्यात शासकीय अथवा खासगी रूग्णालयात बाळाचे 14 आठवड्यापर्यंत प्राथमिक लसीकरण पूर्ण केल्यास व बाळाच्या जन्मदाखल्याची छायांकित प्रत दिल्यानंतर 2 हजार रूपयाचा लाभ दिला जातो. 1 जानेवारी 2017 किंवा त्यानंतर जन्मलेल्या कुटुंबातील पहिल्या जीवंत आपत्यापर्यंत त्या महिलेला टप्प्या -टप्प्याने आर्थिक लाभ दिला जातो.

लाभासाठी आवश्यक कागदपत्रे

या लाभासाठी लाभार्थी महिलेचे व तिच्या पतीचे आधारकार्ड, महिलेचे आधार संलग्न बँक खाते, शासकीय आरोग्य संस्थेत गरोदरपणाची नोंद, किमान एकदा प्रसूतीपूर्व तपासणी केल्याबाबतची नोंद, प्राथमिक लसीकरण पूर्ण केल्याबाबत कार्ड व बाळाचा जन्म नोंदणी दाखला ही आवश्यक कागदपत्रे आहेत.

डिसेंबर 2017 पासून आजपर्यंत जिल्ह्यात 55 हजार 397 लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. 48 हजार 64 लाभार्थ्यांना पहिला लाभ देण्यात आला आहे. 46 हजार 924 लाभार्थ्यांना दुसरा लाभ देण्यात आला आहे. 36 हजार 785 लाभार्थ्यांना तिसरा लाभ देण्यात आला आहे. असे एकूण 21 कोटी 54 लाख 82 हजार अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले आहे. हा लाभ लाभार्थ्यांच्या आधार व बँक खात्याची पडताळणी करून राज्य शासनामार्फत डीबीटीव्दारे लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होतो.

सुरक्षित जननी विकसित धारिणी

8 डिसेंबरपर्यंत साजरा होणाऱ्या सप्ताहाची थीम सुरक्षित जननी विकसित धारिणी अशी असून मातृ शक्ती राष्ट्र शक्ती असे घोषवाक्य आहे. समाजातील सर्व स्तरातील गरोदर व स्तनदा मातांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गलांडे यांनी केले.

Related posts: