|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी व्हावी

पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी व्हावी 

 पुणे / प्रतिनिधी :

‘पत्रकार संरक्षण कायदा’ दोन्ही सभागृहांमध्ये नुसता पारित होऊन उपयोग नाही, तर या कायद्याची अंमलबजवणी झाली पाहिजे. सध्या बेकायद्याचेच राज्य आहे. तिथे कायद्याचेच राज्य चालले पाहिजे. कायद्याच्या पुस्तकातून हा कायदा बाहेर पडून न्यायालयात आला पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.

पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक एस. एम. देशमुख आणि किरण नाईक यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. एक लाख रूपये आणि सन्मानचिन्ह असे या सन्मानाचे स्वरूप आहे. या वेळी पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बापूसाहेब गोरे आदी उपस्थित होते.

राऊत म्हणाले, पत्रकार संरक्षण कायदा पुस्तकातून बाहेर येऊन न्यायालयात आला पाहिजे. असे दोन खटले यशस्वी झाले पाहिजेत, ज्याच्यामुळे हल्ले कमी होतील. कायद्याचेच नाही त्याचबरोबर नितीची शक्ती पाहिजे. असा समाज निर्माण झाला पाहिजे, की त्यामध्ये कोणावरच हल्ले होता कामा नयेत. आत्मिक निर्भरता निर्माण झाली पाहिजे. एस. एम. देशमुख हे एक झपाटलेले झाड आहे. पत्रकारांचे हित कसे होईल, या विचाराने त्यांना झपाटले आहे.

डॉ. सप्तर्षी म्हणाले, लोकांशी संवाद साधताना जनतेला पत्रकारांना ओलांडून जाता येत नाही. संविधानिक नैतिकता पाळणे आवश्यक आहे. आपण संविधानाच्या सीमारेषेवरच घुटमळत आहोत. जाती-धर्मातून देश मुक्त झाला पाहिजे. नवोदित पिढीला मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

माध्यमांमधील बेकारीचा प्रश्न ऐरणीवर ः एस. एम. देशमुख

सत्काराला उत्तर देताना एस. एम. देशमुख म्हणाले, पेन्शनसाठी 22 वर्षे लागली. याकाळात नैराश्य, कौटुंबिक अडचणी आल्या. पत्रकार संरक्षण कायद्यासाठी अनेकदा रस्त्यावर उतरलो. सनदशीर पद्धतीने आंदोलने केली. पत्रकारांनी सामाजिक भानही ठेवले पाहिजे. 323 पैकी 60 लोकांना पेन्शन दिली आहे. हे तोंडाला पाने पुसण्यासारखेच आहे. जाचक अटी रद्द व्हाव्यात, यासाठी नवीन सरकारलाही विनंती करणार आहे. 15 ते 20 वर्षांत एकही नवीन दैनिक किंवा कुठलेही चॅनेल आले नाही. त्यामुळे माध्यमांमध्ये बेकारीचा प्रश्नही मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. अन्य व्यवसाय करून पत्रकारिता करता येईल का, या सगळ्यावर मंथन करावे लागणार आहे.

नाईक म्हणाले, कायद्यासाठी मोर्चे काढताना कुटुंबाचा विचार नव्हता. मी सामाजिक चळवळीतून आलो आहे. लेखणीच्या माध्यमातून आपण दुसऱयांचे प्रश्न सोडवतो. आपले प्रश्न कोण सोडवणार? 2011 पासून हे आंदोलन केले आहे. त्याचे फळ आत्ता मिळत आहे.

 

Related posts: