जेव्हा नासाने मानली हार तेव्हा चेन्नईच्या इंजिनिअरने शोधला ‘विक्रम’

अमेरिकन अंतराळ संस्थेने (नासा) चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची छायाचित्रे जारी केली होती. चेन्नईच्या षण्मुगा सुब्रमण्यमने या छायाचित्रांवर भरपूर मेहनत घेतली आणि दुर्घटनाग्रस्त झालेल्या चांद्रयान–२ च्या विक्रम लँडरच्या अवशेषांचा शोध लावला. षण्मुगाने नासाला याची माहिती दिली आणि त्यांनीही काही वेळातच याला पुष्टीही दिली. नासाने षण्मुगाचे आभार मानत त्याचे कौतुकही केले आहे.
षण्मुगा सुब्रमण्यम उर्फ शान मॅकेनिकल इंजिनिअर आणि कॉम्प्यूटर प्रोग्रामर आहे. सध्या तो चेन्नईतील लेनॉक्स इंडिया टेक्नालॉजी सेंटरमध्ये टेक्निकल आर्किटेक्ट म्हणून कार्यरत आहे. शान मदुराईत राहणारा असून त्याने यापूर्वी कॉग्निजंटसारख्या कंपन्यांमध्येही काम केले आहे. विक्रम लँडरच्या अवशेषांची माहिती घेण्यासाठी शानने नासाच्या लूनर रेकॉन्सेन्स ऑर्बिटरद्वारे (एलआरओ) घेण्यात आलेल्या छायाचित्रांवर काम केले.
७ सप्टेंबर २०१९ ला विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर झालेल्या हार्ड लँडिंगचा हा पैलू शोधून शानने मोठे योगदान दिले आहे.
हे छायाचित्र १७ सप्टेंबर, १२, १५ ऑक्टोबर आणि ११ नोव्हेंबर रोजी घेण्यात आले होते.
P.N