|Friday, December 6, 2019
You are here: Home » संवाद » बेदिलीची दल-दल

बेदिलीची दल-दल 

महाराष्ट्रात सत्ता गेल्यापासून भाजपात चांगलीच बेदिली माजली असून, पक्षातील दावेप्रतिदावे, नाराजीनाटय़े, रुगवेफुगवे ही त्याचीच उदाहरणे मानावी लागतील. केंद सरकारच्या 40 हजार कोटीच्या निधीचा गैरवापर रोखण्यासाठीच बहुमत नसतानाही रात्रीच्या अंधारात गुपचूप देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी उरकून घेतल्याचा गौप्यस्फोट कर्नाटकातील कारवारचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केल्यापासून तर पक्षात नेमके काय चालले आहे असा प्रश्न पडावा. खा. हेगडे यांनी या माध्यमातून वरकरणी पक्षाची बाजू उचलून धरण्याचा प्रयत्न केला असेल. तथापि, यातून शिवसेनेला एकेकाळच्या आपल्या मित्रपक्षाला अडचणीत आणण्यासाठी आयते कोलीतच प्राप्त झाल्याचे पहायला मिळते. स्वाभाविकच अशा प्रकारे केंद्राला निधी परत करणे, हा महाराष्ट्रदोह असून, या संदर्भात अथ &विभागाकडून माहिती घेण्याची भूमिका शिवसेनेने स्पष्ट केली आहे. दुसऱया बाजूला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावला असला, तरी त्यांच्याभोवतीचे संशयाचे मळभ दूर झालेले नाही. हा मुद्दा शिवसेनेने तापविल्यास संपूर्ण महाराष्ट्र भाजपासाठीच ती डोकेदुखी ठरू शकते, याची जाणीव झालेल्या पक्षनेतृत्वानेही खा. हेगडे यांना सबुरीचा सल्ला दिल्याचे बोलले जाते. असे असले तरी शेजारील कर्नाटकातील एक खासदार महाराष्ट्राच्या राजकारणावर एखादे खळबळजनक वक्तव्य करतो, ही बाब सहजासहजी घेण्यासारखी नाही. कर्नाटकात तशी भाजपाची काठावर सत्ता आहे. या राज्यात येडियुरप्पा यांना पर्याय शोधला जात असून, अनंतकुमार हेगडे यांचे नाव पुढे केले जात आहे. मुळात हेगडे हे अत्यंत कडवे नेते मानले जातात. त्यांचा पिंड हा भडकावू विधाने करण्याचा. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या रूपाने खेळलेले हिंदुत्वाचे कार्ड कमालीचे यशस्वी झाले. त्याच धर्तीवर हेगडे यांच्यासारख्या कट्टर हिंदुत्ववादी नेत्याला कर्नाटकात पुढे केल्यास तेथे भाजपाला चांगले यश मिळेल, अशी पक्ष धुरिणांची धारणा. हे पाहता हेगडे यांचे वक्तव्य हा पूर्वनियोजित डावही असेल. सुरुवातीच्या काळात फडणवीसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱया नेतृत्वाचा आता त्यांच्यावर फारसा विश्वास नसावा. हेगडेंचा सांप्रत दावा, त्यांच्या प्रतिमेवरील शिंतोडे अथवा सत्तास्थापनेतील वरिष्ठांची संदिग्ध भूमिका यातून याच गोष्टी अधोरेखित होतात. राज्यातील महत्त्वाची नेतेमंडळीही सध्या नाराज असून, एकनाथ खडसे यांनी तर थेटपणे फडणवीसांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. आपली कन्या रोहिणी व पंकजा मुंडे यांना पराभूत करण्यामागे पक्षातून रसद पुरविली गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर पंकजा मुंडे यांनी ट्विटर हँडलवरून भाजपाचा उल्लेख डिलिट करणे, 12 डिसेंबरला निर्णय घेण्याचे सूतोवाच करणे अथवा त्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण येणे, या सगळय़ा बाबी त्यांच्यातील नाराजीच दर्शवतात. खडसे व मुंडे अशा दोन्ही घराण्यांचा महाराष्ट्र भाजपाच्या विस्तारात मोठा वाटा असून, ओबीसी मते खेचण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात. किंबहुना, आपल्याला बॅकफुटवर आणण्यामागे फडणवीस नीतीच असल्याची त्यांची भावना आहे. साहजिकच त्यांची नाराजी पक्षाला भोवू शकते. त्यात भाजपाला राम राम ठोकून दोन्ही नेते शिवसेनेकडे वळले, तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह अन्यत्रही सेनेला व्यापक अवकाश प्राप्त होऊ शकतो. शिवाय पंकजा कार्ड दादांच्या गोटातल्या धनंजय मुंडे यांना रोखण्याकरिता पवार यांनाही उपयुक्त ठरू शकते. तरीही पंकजा यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद अथवा प्रदेशाध्यक्षपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तसेच खडसे वा त्यांच्या मुलीचेही पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाऊ शकतात. परंतु, त्यांच्या नाराजीनाटय़ाकडे दुर्लक्ष केले गेले, तर पुढचा काळ नक्कीच वादळवाऱयांचा असेल. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळेंसारख्या काही नेत्यांना डावलण्याचा अंगलट आलेला प्रयोगही पक्षाला सुधारावा लागेल. अन्यथा, डोक्याला ताप होण्याचीच शक्यता अधिक. मागच्या पाच वर्षांत महाराष्ट्रात अन्य पक्षांच्या टोळय़ांना सटासट फोडणाऱया भाजपावरही ती वेळ येणार नाही, असे मानायचे कारण नाही. बेदिली या टोकाला गेली आहे, याचे भान धुरिणांनी ठेवावे. सत्ताउतार भाजपाप्रमाणे सत्तास्थानी असलेला राष्ट्रवादीही सध्या वेगळय़ा अवस्थेतून जात आहे. अजितदादांचे बंड शमविण्यात या पक्षाचे नेते शरद पवार यांना यश आले असले, तरी पुन: पुन्हा तोंडघशी पाडणाऱया दादांचाही सोक्षमोक्ष एकदाचा लावावा लागेल. तसा दादांचा गुन्हा अक्षम्य. पवार म्हणतात, त्याप्रमाणे त्यांना त्याची राजकीय किंमत मोजावी लागेल, असे गृहीत धरुया. तरीदेखील अख्खा पक्षच हायजॅक करण्याचे धाडस दाखविणाऱया अजितदादांवर कोणतीही कारवाई होत नाही, हे आश्चर्यकारक. पवार यांनी आपल्या पहिल्यावहिल्या मुलाखतीत देवेंद्र यांना मीपणाचा दर्प नडला, अशी टीका करतानाच राजकारणी विनम्र असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ती यथार्थच असली, तरी हाच मुद्दा अजितदादांनाही लागू होतो. पवार यांची एकूणच मुलाखत संयत, नेमकी. मात्र, इतके महाभारत घडूनही केवळ कार्यकर्त्यांच्या भावना, असे लेबल लावून दादांबद्दल पवार यांनी एवढी सॉफ्ट भूमिका घ्यावी, हे खटकणारे आहे. अजितदादा सध्या शांत असले, तरी त्यांची देहबोली बरेच काही सांगून जाते. पार्थच्या भविष्याची चिंता लागलेला हा पिता आगामी काळातही हातावर हात ठेवून बसेलच, असे मानायचे कारण नाही. हे सारे पवारही जाणत असावेत. स्वाभाविकच दादागिरीचा बंदोबस्त करावा लागेल. कोणत्याही दलाकरिता यश-अपयश हे दोन्ही टप्पे कसोटीचेच. या दोन्ही टप्प्यावर असंतुष्टांमध्ये बेदिली माजू शकते. ही दल-दल वाढत गेली, तर एकूणच आपले पर्यावरण धोक्यात येईल, हे संबंधितांनी ध्यानात घ्यावे.

Related posts: