|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सागवेत प्रकल्प विरोधकांचा आंनदोत्सव

सागवेत प्रकल्प विरोधकांचा आंनदोत्सव 

आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जल्लोष

 शहर वार्ताहर/ राजापूर

तालुक्यातील नाणारमधील ग्रीन रिफायनरी प्रकल्प विरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देताच सागवे येथे रिफायनरी विरोधकांमधून ढोल-ताशांचा गजर अन् एकमेकांना लाडू भरवून जल्लोष करत आंनदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळल्याबद्दल खास आभार मानण्यात आले. तर 2 वर्षानंतर आजपासून आम्ही खऱया अर्थाने दिवाळी साजरी करीत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या.  

तालुक्यातील नाणार परिसरातील 14 गावांमध्ये ग्रीन रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येत होता. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्ष व येथील विरोधात स्थापन करण्यात आलेल्या विविध संघटनानी आंदोलने केली होती. मार्च 2018 रोजी रिफायनरी प्रकल्पाविरोधात जेलभरो आंदोलन छेडण्यात आले होते. दरम्यान प्रकल्पाविरुध्द आंदोलने केल्यामुळे कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम व त्यांचे 26 सहकारी यांच्यावर नाटे पोलीस ठाण्यात एकूण 3 प्रकारचे गुन्हे दाखल झाले होते. तर आमदार राजन साळवी व त्यांच्यासमवेत सेनेच्या 33 पदाधिकारी व शिवसैनिकांवर राजापूरच्या आमसभेदरम्यान शासनाच्या प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन केले होते. त्यामुळे त्या सर्वांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. राष्ट्रवादीचे युवा नेते अजित यशवंतराव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजापूर रोड रेल्वेस्टेशन आवारात लावलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या जाहीर फलकांना काळे फासले होते. त्यावेळीही पोलिसांनी यशवंतराव व अन्य पंधरा ते सोळाजणांविरुध्द गुन्हे दाखल केले. हे गुन्हे राजापूर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रिफायनरीच्या पार्श्वभूमीवर नाणारचा दौरा केला होता. यावेळी नाणारवासियांच्या भावना जाणून घेत कोणत्याही परिस्थितीत नाणार परिसरात हा प्रकल्प होऊ देणार नाही, या परिसरातील ग्रामस्थांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहणार, अशी ग्वाही दिली. त्यानुसार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यास सरकारला भाग पाडले. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेणार, असे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पूर्ण केले नसल्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच रिफायनरी प्रकल्प विरोधातील आंदोलनकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश गृहखात्याला दिले.

या पार्श्वभूमीवर शिवसेना व रिफायनरी प्रकल्पविरोधी संघटना मुंबई, रिफायनरीविरोधी मच्छीमार, शेतकरी संघटना आदी पदाधिकाऱयांसह परिसरातील ग्रामस्थांनी सागवे येथे ढोल-ताशांच्या गजरात, एकमेकांना लाडू भरवून जल्लोष करत आंनदोत्सव साजरा केला. यावेळी सेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, क्षेत्राध्यक्ष जया माने, सभापती अभिजित गुरव, अशोक वालम, कमलाकर कदम, जुनेद मुल्ला, रामचंद्र सरवणकर, नाना गोटम, मधुकर बाणे, जितेंद्र लांजेकर, नेहा दुसणकर, भाई सामंत, राजेंद्र कुवळेकर यांसह परिसरातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

उध्दव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला

सेनेच्या माध्यमातून विधीमंडळ ते संसदेपर्यत हा प्रकल्प हटवण्यासाठी आवाज उठवण्यात आला. या कामी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, उदय सामंत यांचे मोठे योगदान आहे आणि त्याहीपेक्षा आमचे पक्षप्रमुख ठाकरे यांनी प्रकल्प हटवणारच, हा दिलेला शब्द पाळला असून हा प्रकल्प रद्द केला आहे. त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड होताच या प्रकल्पविरोधातील आंदोलनकर्त्यांवर असलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येथील जनता अंत्यत खुश झाली असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

-विलास चाळके सेना जिल्हाप्रमुख

 

मुख्यमंत्र्यांमुळे राज्याचे भवितव्य उज्ज्वल

जाणता राजा म्हणावे, असे मुख्यमंत्री या राज्याला लाभले आहेत. तळागळातील जनतेला कसा न्याय दिला जातो, हे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आरे व रिफायनरी प्रकल्पाविरोधात उभारलेल्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेत दाखवून दिले आहे. त्यामुळे अशा मुख्यमंत्र्यांमुळे राज्याचे भवितव्य उज्ज्वल आहे. त्यांनी घेतलेला हा धाडसी निर्णय असून त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा!

-अशोक वालम कोकण महाशक्ती

 

मुख्यमंत्री ठाकरेंचे ग्रामस्थांमधून खास अभिनंदन

गेली 2 वर्षे या परिसरातील 14 गावांमध्ये दिवाळी ही काळी दिवाळी म्हणून साजरी करण्यात येत होती. ग्रीन रिफायनरी प्रकल्पविरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देताच सागवेत रिफायनरी विरोधकांमधून खऱया अर्थाने दिवाळी साजरी करण्यात येत आहे. आमचे नेते व मुख्यमंत्री ठाकरे यांचे परिसरातील ग्रामस्थांमधून खास अभिनंदन करीत आहोत.

-कमलाकर कदम

अध्यक्ष रिफायनरीविरोधी मच्छीमार, शेतकरी संघटना

 

 

Related posts: