|Monday, February 17, 2020
You are here: Home » क्रिडा » दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत भारताला दुहेरी सुवर्ण पदक

दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत भारताला दुहेरी सुवर्ण पदक 

वृत्तसंस्था/ काठमांडू

13 वी दक्षिण आशियाई स्पर्धा काठमांडू व पोखरा, नेपाळ येथे सुरू असून सदर स्पर्धेत खो-खो सामने काठमांडू येथे संपन्न झाले. बुधवारी झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये भारताच्या पुरुष व महिला संघांनी आपआपले सामने रुबाबात जिंकत सलग दुसरे सुवर्णपदक दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत पटकावले. भारतीय खो-खो संघांनी मिळवलेल्या दुहेरी सुवर्ण पदकामुळे सर्वच थरातून खो-खो खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेतील पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा 16-09 असा एक डाव सात गुणांनी पराभव केला. या सामन्यात दीपक माधवने दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण केले व आक्रमणात पाच खेळाडू बाद करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. बी. राजुने दोन मिनिटे पन्नास सेकंद संरक्षण केले व दोन खेळाडू बाद केले, अक्षय गणपुलेने दोन मिनिटे पन्नास सेकंद संरक्षण केले, तर आक्रमणात सुदर्शन व अभिनंदन पाटील यांनी प्रत्येकी तीन-तीन खेळाडू बाद केले. बांगलादेशच्या ईदीलने एक मिनिट वीस सेकंद संरक्षण केलं व गंठीने व मारमाने प्रत्येकी दोन-दोन खेळाडू बाद केले परंतु हे सर्व खेळाडू आपल्या संघाला मोठय़ा पराभवापासून वाचवू शकले नाहीत.

महिलांत भारत अजिंक्य

महिलांच्या अंतिम सामन्यात भारताने यजमान नेपाळवर 17-05 असा एकडाव बारा गुणांनी विजय संपादन करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. सामन्याच्या पहिल्या डावात भारताच्या ऐश्वर्या सावंतने तीन मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण केले, प्रियंका भोपीने दोन मिनिटे पन्नास सेकंद संरक्षण केले, कृष्णा यादवने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण केले, आक्रमणात कर्णधार नसरीन व काजल भोरने प्रत्येकी पाच-पाच खेळाडूंना बाद केले व विजय सोपा केला. दुसऱया डावात सस्मिता शर्माने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण केले, मुकेशने तीन मिनिटे संरक्षण केले, तर कलाईवनीने दोन मिनिटे संरक्षण केले व मोठा विजय साजरा केला. तर नेपाळच्या पुनम थारूने एक मिनिट दहा सेकंद संरक्षण केले व अंजली थापाने एक मिनिट संरक्षण करून जोरदार लढा देण्याचा प्रयत्न केला मात्र त्या आपल्या संघाला मोठय़ा पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत.

पुरुषांच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात यजमान नेपाळने बांगलादेशचा 13-07 असा एक डाव राखून 6 गुणांनी विजय मिळवला. तर महिलांच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा 10-07 असा एक डाव राखून तीन गुणांनी दणदणीत विजय मिळवला. 

Related posts: