|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अनगोळ योजना क्र.62 च्या जागेची बुडाकडून पाहणी

अनगोळ योजना क्र.62 च्या जागेची बुडाकडून पाहणी 

बेळगाव / प्रतिनिधी

अनगोळ परिसरात वसाहत निर्माण करण्याचा निर्णय बुडाने घेतला आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत योजना क्र. 62 राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यादृष्टीने बुधवारी बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांनी अधिकाऱयांसमवेत पाहणी केली. 50:50 या तत्त्वावर योजना राबविण्यास जागा मालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बुडा आयुक्तांनी केले.

अनगोळ येथील योजना क्रमांक 62 राबविण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यामध्ये बुडाला यश आले नाही. जमीन मालकांनी व शेतकऱयांनी योजना राबविण्यास आक्षेप घेऊन विरोध केला होता. सर्वेक्षण करण्यास गेलेल्या अधिकाऱयांना परत पाठविले होते. त्यामुळे ही योजना राबविण्यात बुडाला यश आले नाही. पण यापूर्वी प्राथमिक नोटीस बजावण्यात आलेल्या योजना राबविण्याच्या मुद्दय़ावर बुडाच्या बैठकीत चर्चा झाली होती. बेनकनहळ्ळी, हिंडलगा, अनगोळ, झाडशहापूर, जैतनमाळ अशा विविध परिसरातील वसाहत योजना राबविण्यासाठी भू-संपादन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांनी अनगोळ परिसरातील जागेची पाहणी करून आढावा घेतला.

येळ्ळूर रोड ते अनगोळपर्यंतच्या मधल्या टप्प्यात असलेल्या 142 एकरमध्ये ही योजना राबविण्याचा प्रस्ताव आहे. त्याकरिता पाहणी करण्यात आली. प्रमुख रस्त्याशेजारी असलेल्या जागेमध्ये काही लेआऊट्स निर्माण करून घरे बांधण्यात आली आहेत. मात्र, बहुतांश जागा शिल्लक असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. या ठिकाणी संपर्क रस्ते व आवश्यक सुविधादेखील उपलब्ध नाहीत. त्यामुळे ही योजना राबविण्यास काहीच हरकत नाही, असे मत आयुक्तांनी व्यक्त केले.  या पाहणीवेळी योजनाधिकारी श्वेता शिवपुजीमठ, साहाय्यक योजना अधिकारी रक्षित सोमण्णावर, हेमंत हुबळी व इतर अधिकारी उपस्थित होते.

50:50 तत्त्वानुसार अशी होणार विभागणी 

50:50 या तत्त्वावर जागा मालकांनी जमिनी दिल्यास योजना क्र. 62 राबविता येते. शेतकऱयांनी व जमीन मालकांनी अनधिकृत वसाहती निर्माण करण्याकडे वळण्याऐवजी बुडाला जागा हस्तांतर करावी, 50:50 या तत्त्वावर योजना राबविण्यास संमती द्यावी, असे आवाहन बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांनी केले आहे. उदा. 10 एकर जागा हस्तांतर केल्यास या जागेत गटार, रस्ते, गार्डन, खुली जागा, विद्युत पुरवठा, नळ योजना आदी नागरी सुविधा उपलब्ध करता येतील. खुल्या जागा, गार्डन, रस्ते याकरिता 5 एकर जागा लागू शकते. या सर्व सुविधा राबविण्यात आल्यानंतर उर्वरित 5 एकरपैकी अडीच एकरचे भूखंड जागा मालकांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रति एकर विकसित केलेल्या लेआऊटमधील 10 गुंठय़ाचे भूखंड जागा मालकाला मिळू शकतात. त्यामुळे याचा विचार जागा मालकांनी व शेतकऱयांनी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Related posts: