|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पोटनिवडणुकीची रणधुमाळी आज

पोटनिवडणुकीची रणधुमाळी आज 

वार्ताहर/ अथणी

राज्यातील सत्ता बदलास कारणीभूत ठरलेल्या बंडखोर आमदारांमुळे 15 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. पंधरा दिवसांच्या प्रचार तोफा धडाडल्यानंतर या मतदारसंघांत गुरुवारी मतदान होत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणाऱया या मतदानाकडे केवळ राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बेळगाव जिल्हय़ात अथणी, कागवाड व गोकाक या तीन मतदारसंघात गुरुवारी रणसंग्राम होणार आहे.

अवघ्या दीड वर्षात पुन्हा निवडणूक लागल्याने जिल्हय़ातील अथणी, कागवाड व गोकाक मतदारसंघ चर्चेचा विषय बनले आहेत. मे 2018 मध्ये निवडून आलेल्या बेळगाव जिल्हय़ातील रमेश जारकीहोळी, श्रीमंत पाटील व महेश कुमठहळ्ळी या काँग्रेस आमदारांनी बंडखोरी केली. यामुळे ते अपात्र ठरले असले तरी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निवडणूक लढविण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे हे तीनही उमेदवार भाजप प्रवेश करून पुन्हा एकदा निवडणुकीस सामोरे जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविलेले हे उमेदवार आता गुरुवारी जनतेच्या न्यायालयात दाद मागणार आहेत.

सर्वोतोपरी तयारी

तीनही मतदारसंघात गेले पंधरा दिवस राज्य पातळीवरील आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह मंत्री व आमदारांनी प्रचार सभांचा धडाका लावला. यामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांबरोबरच पुन्हा एकदा मतदारांना विकासाचे गाजर दाखविण्यात आले आहे. यातून कोणत्या उमेदवारास संधी द्यायची हे मतदार गुरुवारी ठरविणार आहेत. कागवाड विधानसभा मतदारसंघात अनंतपूर, मदभावी या जि. पं. मतदारसंघात तर अथणी विधानसभा मतदारसंघातील तेलसंग, ऐगळी या जि. पं. मतदारसंघातील अनेक मतदार दिवाळीनंतर ऊसतोड तसेच वीटभट्टीच्या कामासाठी स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे या मतदारांना आणून मतदान करून घेण्याचे आवाहन उमेदवारांसमोर असणार आहे. अवघ्या दीड वर्षात सत्तानाटय़ानंतर पुन्हा निवडणूक लागल्याने मतदार मतदानासाठी फारसे उत्साही दिसून येत नाहीत. त्यामुळे याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. असे असले तरी निवडणूक आयोगाने मात्र मतदान अधिक व्हावे यासाठी सर्वोतोपरी तयारी केली आहे.

उस्फूर्तपणे मतदान करण्याचे आवाहन

मतदानादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी अथणी व कागवाड मतदारसंघात दोन पोलीस उपअधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली एकूण 2500 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर एक एएसआय व दोन पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीसाठी जिल्हय़ातील अन्य तालुक्याबरोबरच महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेश राज्यातूनही पोलीस बळ मागविण्यात आले आहे. तसेच अथणी आगारात बसेस कमी असल्याने निपाणी, चिकोडी व रायबाग आगारातून बसेस मागविण्यात आल्या आहेत. एकूणच मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून मतदारांनी निर्भयपणे व उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात आले आहे.

गोकाक मतदारसंघात काँटे की टक्कर

गोकाक : राज्यातील काँग्रेस व निजद युती सरकार पायउतार होण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरलेले रमेश जारकीहोळी हे भाजप उमेदवार म्हणून पोटनिवडणुकीस सामोरे जात आहेत. तर त्यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवार म्हणून त्यांचेच बंधू लखन जारकीहोळी रिंगणात उतरले आहेत. या दोघा भावांच्या भांडणात विजयाची आशा दिसल्याने निजदनेही अशोक पुजारी यांना रिंगणात उतरविले आहे. आजपर्यंतचा प्रचार पाहिल्यास या तिन्ही उमेदवारांमध्ये जोरदार चुरस पहायला मिळत आहे. गुरुवारी मतदानानंतर 11 उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद होणार आहे.

गोकाक मतदारसंघात एकूण 2 लाख 42 हजार 124 मतदार असून त्यामध्ये 1 लाख 19 हजार 737 पुरुष, 1 लाख 22 हजार 373 महिला तर 14 तृतीयपंथी मतदार आहेत. या मतदारसंघात 4 हजार 763 नवमतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंघात गोकाक व कोन्नूरनजीक नाईकवाडी येथे पिंक मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतदान शांततेत पार पडावे यासाठी 54 भरारी पथके व 67 सेक्टर ऑफिसर कार्यरत असणार आहेत. याशिवाय 2 डीवायएसपी, 5 सीपीआय, 8 पीएसआय, 26 एएसआय, 340 पोलीस कर्मचारी व 321 होमगार्ड तसेच 5 डीएआर पथक व 5 केएसआरपी पथक तैनात असणार आहेत.

मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचारी बुधवारी सायंकाळी रवाना झाले. मतदानासाठी मशीनची ने-आण करण्यासाठी 32 बस व 26 प्रुझर वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Related posts: