|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गोळी लागून शिकारी युवक जागीच ठार; अपघात की घातपात ?

गोळी लागून शिकारी युवक जागीच ठार; अपघात की घातपात ? 

प्रतिनिधी / गुहागर

शिकारीला गेलेल्या तीन युवकांपैकी एका युवकाला बंदुकीची गोळी लागून तो जागीच ठार झाला. ही घटना गुहागर तालुक्यातील देवघर येथील जंगलात बुधवारी सायंकाळी चार ते सात वाजण्याच्या दरम्यान घडली. सिद्धेश संतोष गुरव (वय 19) रा. मार्गताम्हाणे असे या युवकाचे नाव आहे. या घटनेने येथील परिसरात खळबळ माजली आहे.

चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील तिघे मित्र देवघर येथे शिकारी करता गेले होते. बुधवारी सायंकाळी चार ते सात या वेळेत शिकारीला गेलेल्या तिघांतील सिद्धेश संतोष गुरव याला बंदुकीची गोळी लागून तो जागीच ठार झाला. या घटनेची कोणालाच माहिती नव्हती.

दरम्यान, याबाबत गुहागर पोलिसांनाही उशिरा माहिती कळली. यामुळे रात्री साडेआठ वाजता गुहागर पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, उपनिरीक्षक ब्रह्मानंद कुमार जाधव, पोलीस सहकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे घटनास्थळी दाखल झाले. या घडलेल्या घटनेची पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांना माहिती देताना, सिद्धेश संतोष गुरव याच्या डाव्या हाताच्या पंजातून गोळी आरपार जात तोंडाच्या डाव्या बाजूच्या जबड्यात घुसली. यातच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

सिद्धेशच्या डाव्या हातामध्येच 12 बोरची सिंगल काडतूसाची बंदूक आढळून आली. या घटनेचा अधिक तपास करताना त्याच्याबरोबर मार्गताम्हाणे येथील आणखी दोन साथीदार गेल्याचे समजले. यामुळे अग्नेश चव्हाण, यश पोतदार दोघेही राहणार मार्गताम्हाने यांनाही गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे तिघेही शिकार करताच जंगलात गेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर झालेल्या मृत्यूमध्ये हा अपघात की घातपात हे अधिक तपासामधूनच पुढे येणार आहे. गुहागर पोलिसांनी प्राथमिक अपघात म्हणून नोंद केली असून मृत सिद्धेश याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रत्नागिरी येथे नेण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद बोडके करत आहेत.

Related posts: