|Monday, January 27, 2020
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » नौदलात अधिकारी व्हायचंय

नौदलात अधिकारी व्हायचंय 

नौदलात नोकरीचा विचार करत असाल किंवा संधीची वाट पहात असाल तर सध्याला ही संधी काबीज करता येणार आहे. भारतीय नौदलात ऑफिसर पदावर नोकरी करण्याची प्रबळ इच्छा असणाऱयांकरीता शॉर्ट सर्व्हिस कमिशनने इंडियन नेव्ही एंट्रन्स टेस्ट फेब्रुवारी 2020 मध्ये आयोजित केली आहे. त्याकरीता 19 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

भारतीय संरक्षण व्यवस्थेत सैन्य दल व तटरक्षकदल जसे महत्त्वाचे तसे नेव्ही अर्थात नौदलाचे महत्त्वही कैकपटीने जास्त आहे. भारतीय नौदलात आपल्याला नोकरी करायची इच्छा असेल तर सध्याला एसएससीअंतर्गत ऑफिसर पदावरची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. ही संधी साधायची असेल तर मात्र उमेदवारांना इंडियन नेव्ही एंट्रन्स टेस्ट (आयएनइटी) देणे आवश्यक असते.

भारतीय सेनेचे आकर्षण आजही युवकांमध्ये सर्वाधिक आहे. संरक्षणसिद्धतेत सैन्यदल, तटरक्षकदल आणि नौदल यांचा वाटा खूपच मोलाचा म्हणता येतो. आपल्या देशाची शान या तिन्ही दलांच्या कामगिरीमुळे इतर देशांच्या तुलनेत नेहमीच उंचावलेली दिसते. म्हणून आजही या क्षेत्रात नोकरी करण्यासाठी युवकांची धडपड दिसून येते. नौदलात नोकरी करण्याची नामी संधी सध्या चालून आलेली आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन अर्थात कर्मचारी निवड आयोगाने ऑफिसर पदासाठी भरतीचे प्रयोजन केले आहे. अविवाहीत पुरूष आणि महिलांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करण्यात आलीय. एक्झिक्युटीव्ह ब्रांच, टेक्नीकल ब्रांच, एज्युकेशन ब्रांचअंतर्गत सुरू होणाऱया अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. जानेवारी 2021 पासून अभ्यासक्रमास सुरूवात होणार आहे.

 विविध केडर, ब्रांचनुसार एकूण 144 पदे, टेक्नीकल ब्रांचमध्ये एसएससी इंजिनियरिंग ब्रांचसाठी (जनरल सर्व्हिस) 26, इलेक्ट्रीकल ब्रांचसाठी (जनरल सर्व्हिस) 27 पदे आणि एज्युकेशन ब्रांचअंतर्गत 15 पदे भरली जाणार आहेत. एक्झिक्युटीव्ह ब्रांचमध्ये एसएससी जनरल सर्व्हिस/हायड्रो केडरची 30 पदे, एसएससी एक्स (आयटी) ची 10, एसएससी लॉजिस्टीक्सची 11, एसएससी पायलटची 6, एसएससी पायलट (एमआर) ची 3, एसएससी ऑब्जर्व्हरची 6, एसएससी एटीसीची 4, एसएससी नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्टोरेट कॅडरची 6 पदे भरली जाणार आहेत.

 टेक्नीकल ब्रांच पदे व एसएससी जनरल सर्व्हिस/हायड्रो कॅडर, एसएससी एक्स(आयटी) या पदांसाठी केवळ पुरूष अविवाहीत उमेदवारच अर्ज करू शकतात. इतर पदांवर दोघांनाही अर्ज करता येणार आहे.

पात्रता काय लागते-

मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 टक्के गुणांसह संबंधीत शाखेत बीई, बीटेक, एमबीए, बीएससी, बीकॉम, बीएससी, एमएससी केलेल्यांना अर्ज करता येणार आहे. पदानुसार योग्यता आणि वयोमर्यादेविषयी सविस्तर माहिती संकेतस्थळावर जाणुन घेता येईल.

 निवड प्रक्रिया- निवडीआधी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे. इंडियन नेव्ही एंट्रन्स टेस्टमधील यशस्वी उमेदवारांना मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी द्यावी लागणार आहे. मेरीटवर आधारीत उमेदवारांना भारतीय नौदल अकादमी, एझिमला, केरळमध्ये जानेवारी 2021 पासून सुरू होणाऱया प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.

आयएनइटी प्रवेश परीक्षेचे आयोजन फेब्रुवारी 2020 मध्ये करण्यात आले असून ही ऑनलाइन परीक्षा 2 तासाची असणार आहे. यात 100 बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. इंग्रजी, रिझनिंग आणि न्युमरिकल एबिलीटी, जनरल सायन्स, मॅथमेटीकल ऍप्टीटय़ूड अँड जनरल नॉलेजवर आधारीत प्रश्न विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे एक गुण कापला जाणार आहे.

 मुलाखत – परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना निवडून त्यांना पुढे समितीतर्फे मुलाखतीसाठी बोलावलं जातं. याचे आयोजन एप्रिल 2020 मध्ये बेंगळूर, भोपाळ, विशाखापट्टणम, कोलकाता येथे होणार आहे.

अभ्यासक्रमाची तयारी- अभ्यासाची तयारी करायची असेल तर अभ्यासक्रम नीट समजून घ्यायला हवा. आधी कठीण विषयांचा अभ्यास करायला हवा. जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा सराव करा. करंट अफेयर्सचा विषय गांभिर्याने घ्या आणि त्याची तयारी नीट करा. त्यासाठी रोजची वर्तमानपत्रे, मासिके वाचता येतील. त्यावर नोटस् तयार करा. प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव जरूर करावा. परीक्षेच्या दोन-तीन आठवडे आधी अभ्यासक्रमाची तयारी करावी.

 अर्जाचे शुल्क- परीक्षा शुल्क म्हणून 215 रुपये घेतले जाणार आहेत. काही वर्गातील उमेदवारांना शुल्कात सवलत असेल.

 शेवटची तारीख- 19 डिसेंबर 2019 ही अर्ज दाखल करायची शेवटची तारीख असणार आहे.

अधिक माहितीसाठी वेबसाइट-
http://www.davp.nic.in

Related posts: