|Saturday, February 29, 2020
You are here: Home » क्रिडा » पाकच्या ऐतिहासिक कसोटीत तिसऱया दिवशीही पावसाचा अडथळा

पाकच्या ऐतिहासिक कसोटीत तिसऱया दिवशीही पावसाचा अडथळा 

वृत्तसंस्था/ रावळपिंडी

तब्बल दहा वर्षानंतर पाकमध्ये खेळविण्यात येत असलेल्या पाक आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीत शुक्रवारी खेळाच्या तिसऱया दिवशी पावसाचा अडथळा आल्याने केवळ 5.2 षटकांचा खेळ झाला. या कसोटीतील पहिल्या तीन दिवसांच्या खेळामध्ये केवळ 91 षटकांचा खेळ झाला.

एक दशकानंतर पाकच्या भूमीवर कसोटी क्रिकेटचे पुनरागमन झाल्याने शौकीनांची उत्सुकता वाढली होती. लंका आणि पाक यांच्यात ही कसोटी मालिका खेळविली जात आहे. रावळपिंडीच्या पहिल्या कसोटीत शुक्रवार खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर लंकेने पहिल्या डावात 6 बाद 282 धावा जमविल्या. लंकेचा धनंजय डिसिल्वा 87 धावावर खेळत आहे.

या कसोटीत गुरूवारी खेळाच्या दुसऱया दिवशी पावसाळी वातावरण आणि अंधूक प्रकाशामुळे 83 मिनिटांचा खेळ झाला होता. लंकेने 6 बाद 263 या धावसंख्येवरून शुक्रवारी खेळाला पुढे सुरूवात केली आणि 27 मिनिटांच्या कालावधीत 5.2 षटकात लंकेने 19 धावांची भर घातली. धनंजय डिसिल्वा आपल्या कसोटीतील चौथ्या षटकाकडे वाटचाल करीत आहे. डि परेरा 6 धावावर खेळत आहे. शुक्रवारी या कसोटीला केवळ 2 हजार शौकीन उपस्थित होते. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक होता. पाकतर्फे 16 वर्षीय वेगवान गोलंदाज नसिम शहाने 83 धावात 2 तर शाहिन आफ्रिदीने 59 धावात 2 गडी बाद केले आहेत.

2009 साली लंकेचा संघ पाकच्या दौऱयावर गेला असताना या संघातील खेळाडूंना हॉटेलमधून स्टेडियमकडे नेत असताना त्यांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये लंकेचे काही खेळाडू व अधिकारी जखमी झाले होते. या हल्ल्यात आठजण ठार झाले होते. या घटनेनंतर पाकच्या दौऱयावर कोणताही विदेशी संघाने जाण्यास नकार दिला होता. आता 2029 साली पुन्हा लंकेच्या संघाने पाक दौऱयावर जाण्यास होकार दिला होता. उभय संघातील दुसरी आणि शेवटची कसोटी कराचीत 19 डिसेंबरपासून खेळविली जाणार आहे.

Related posts: