|Monday, January 27, 2020
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » ‘फ्लोरिकल्चर’ची वेगळी वाट…

‘फ्लोरिकल्चर’ची वेगळी वाट… 

कृषी क्षेत्रात येणाऱयांची संख्या आज वाढते आहे. आता उच्च शिक्षीतही या क्षेत्राची कास पकडताना दिसत आहेत. शेतीची आवड असेल किंवा ऍग्रिकल्चरकडे जाण्याचा विचार असेल तर  फ्लोरिकल्चर क्षेत्राच्या वेगळय़ा वाटेचा मार्ग नक्कीच  अवलंबता येतो.

सध्या करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असताना नेहमीचं करिअर सोडून बरेच जण वेगळय़ा वाटांचा शोध घेत असतात. यात सध्या पारंपारिक शेती व्यवसायाचा विचार करणारे फारच थोडे लोक सापडतील. मध्यंतरीच्या काळात मागे पडलेल्या या क्षेत्रात आता मात्र अनेक संधी उपलब्ध आहेत. शेती म्हटलं की आपल्या डोळय़ासमोर फक्त अन्न, धान्य, फळे याच गोष्टी येतात. या अनुषंगाने सध्या फ्लोरिकल्चरचे क्षेत्रही बऱयापैकी नाव कमावत असताना दिसत आहे. 

 2018 मध्ये या क्षेत्राची भारतीय बाजारातील उलाढाल 157 अब्ज रुपयांची होती. येत्या 2024 पर्यंत ही बाजारपेठ 472 अब्ज रुपयांच्या उलाढालीची होईल व वार्षिक 20 टक्क्यांनी विकसित होईल. ही बाजारपेठ 2017 मध्ये 130 अब्ज रुपयांच्या उलाढालीची होती. फुलांशी निगडीत असं हे क्षेत्र आहे. ज्यात फुलांची निर्यात, त्यांच्यावर प्रोसेसिंग, त्याच्यापासून तेल, अर्क, परफ्युमची निर्मिती, सौंदर्य प्रसाधनासाठी फुलांचा वापर करणे त्यासाठी त्यावर संशोधन करणे, फुलांची रोपवाटीका तयार करणे, त्या रोपांची निर्यात करणे, असा या क्षेत्राचा बराच मोठा आवाका आहे. फुलांचा वापर नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी, सुगंधासाठी, औषधांसाठी केला जातो. सौंदर्यप्रसाधने व सजावटीसाठी तर फुलांचा वापर होतोच पण दुसरीकडे व्हॅलेंटाइन डे, लग्नसमारंभ, वाढदिवस, प्रेंडशिप डे, मदर्स, फादर्स डे, सण-समारंभ, उत्सवासाठीही मोठय़ा प्रमाणात फुलांचा उपयोग केला जात आहे. 

 फ्लोरिकल्चरची सुरुवात साधारणतः 1800 सालात इंग्लंडमध्ये झाली. तोपर्यंत फुलांची शेती हा प्रकारच अस्तित्त्वात नव्हता, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आता मात्र या क्षेत्राला जगभर मान्यता मिळाली आहे व अशा प्रकारचे काम करणाऱयांना जगभर मागणी आहे. सध्या नेदरलँड, जर्मनी, फ्रान्स, इटली, जपान, कोलंबिया, स्पेन, केनिया हे या क्षेत्रातले अग्रेसर देश असले तरी भारतातही फ्लोरिकल्चर या क्षेत्राबद्दल जागरूकता वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय फुलांना खासी मागणी आहे.

 भारतात फ्लोरिकल्चरच्या क्षेत्रात कर्नाटक राज्य आघाडीवर आहे. भारतात होणाऱया फुलांच्या एकूण होणाऱया निर्मितीपैकी जास्तीत जास्त वाटा कर्नाटक राज्य उचलते. 2018 च्या सर्व्हेक्षणानुसार कर्नाटकात 29 हजार 700 हेक्टर्स क्षेत्रफळात पुष्पशेती घेतली जाते. कर्नाटकासह तामिळनाडू, आंध्र प्रदेश या दक्षिणेतील राज्यातही मोठय़ा प्रमाणात पुष्पशेती घेतली जाते. याखेरीज आता महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, हरयाणा, प. बंगाल ही राज्येही या क्षेत्रात उतरली आहेत.

मुळातच निसर्गात रमण्याची आणि फुलांची आवड असणाऱयांनी या क्षेत्रात करिअर करायला हरकत नाही.

 फ्लोरिकल्चर या क्षेत्रात येण्यासाठी 12 वी सायन्स असणे आवश्यक आहे. त्यात पीसीबी म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय निवडावे लागतात. यामुळे 12 वी सायन्सनंतर हॉर्टीकल्चर किंवा ऍग्रिकल्चर असा विषय घेऊन बीएससी आणि मग एमएससी करता येते व एमएससी करताना फ्लोरिकल्चर हा स्पेशल विषय म्हणून निवडता येतो. या क्षेत्रात पीएचडीही करता येते. रिसर्च आणि डेव्हलपमेंटची आवड असेल तर एमएससीनंतर फ्लोरिकल्चर हा विषय पीएचडीसाठी घेता येतो. पण त्यासाठी मास्टर्स डीग्री ही हॉर्टीकल्चर किंवा ऍग्रिकल्चरमध्येच असावी लागते. याव्यतिरिक्त जर फ्लोरिकल्चरबरोबर मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलंत तर फुलांचं किंवा फुलझाडांचं मार्केटिंग करणे त्यावर प्रोसेसिंग करणे (प्रक्रिया)याचाही विचार करता येतो. काही विद्यापीठामध्ये बीएससीनंतर म्हणजेच पदवीनंतर फ्लोरिकल्चर डिप्लोमा किंवा कोर्स उपलब्ध आहेत. उदा. अन्नमली विद्यापीठ तामिळनाडू किंवा अलाहाबाद स्कूल ऑफ ऍग्रिकल्चर, उत्तरप्रदेश, पंजाब ऍग्रिकल्चर विद्यापीठ, लुधियाना (पंजाब) इ. किंवा बीएससी आणि एमएमसी ऍग्रिकल्चर मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरी, भारती विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे शिकता येते.

 संधी- या क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर सरकारी खात्यात नोकरीच्या अनेक संधी आहेत. शिवाय इस्टेट मॅनेजर, प्लांटेशन एक्सपर्ट, सुपरवायझर प्रोजेक्ट कॉर्डिनेटर, कन्सल्टंट अशा अनेक पदांवर मोठमोठय़ा कंपनीत काम करता येते. तसंच पीएचडी केलं असेल तर किंवा रिसर्च करत असाल तर फार्मिंग डेव्हलपमेंट करता येते. त्याचप्रमाणे फ्लोरल डिझायनर, लँडस्केप डिझायनर, लँडस्केप आर्किटेक्ट किंवा हॉर्टिकल्चर थेरपिस्ट म्हणूनही काम बघता येतं. परीक्षक, निरीक्षक म्हणूनही काम करता येतं. शिकवण्याची आवड असेल तर टिचिंगकडेही वळता येते. तसंच आपण स्वतःचा व्यवसायही सुरु करू शकता. ज्यात नर्सरी सुरु करून फुलांचा व्यवसाय, रोपवाटीका तयार करणे, यात उत्तम दर्जाची रोपं व फुलं असतील तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही व्यवसाय करता येतो. तसंच वेगवेगळय़ा कार्यक्रमात सजावटीसाठी फुलांची मोठी मागणी असते. अशा ठिकाणी नर्सरीतील उत्तम दर्जाची फुलं पाठवणं त्यांचं डिझायनिंग करून व्यवसाय अधिक फुलवता येतो.

 सगळय़ात आधी निसर्गाप्रती प्रेम आणि आपुलकी असली पाहिजे. संयमाने काम करण्याची तयारी हवी. निरीक्षणशक्ती चांगली हवी. क्रिएटिव्हिटी आणि कलात्मक दृष्टीकोन असावा लागतो, तुमचा फिजिकल स्टॅमिनाही उत्तम हवा, म्हणजेच तुम्ही काटक असणे गरजेचे आहे. कॉम्प्युटर क्षेत्रातले जर थोडेफार ज्ञान असेल तर तुमच्यासाठी संधी वाढू शकतात. ज्यांच्याजवळ स्वतःची शेती आहे अथवा शेती-विषयक शिक्षण आता चालू असेल तर स्पेशल विषय म्हणून फ्लोरिकल्चरचा विचार करायला काहीच हरकत नाही. या व्यतिरिक्त बारावीनंतर ज्यांना ऍग्रिकल्चर करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी फ्लोरिकल्चर हे बुमिंग करिअर ठरू शकते.

Related posts: