|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळूण बाजारपेठ मुख्य रस्ता 15 मीटरचा होणार!

चिपळूण बाजारपेठ मुख्य रस्ता 15 मीटरचा होणार! 

प्रतिनिधी/ चिपळूण

शहरातील अरूंद असलेल्या बाजारपेठेतील मुख्य रस्त्याची रूंदी वाढवली जाणार आहे. त्यासाठी व्यापाऱयांना विश्वासात घेण्यासाठी 16 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता नगर परिषदेत त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही रूंदी वाढल्यास पावसाळय़ात गटाराचे तुंबणारे पाणी व सातत्याने होणारी वाहतूक कोंडी यावर चांगला परिणाम होणार आहे.

बाजारपेठेतील रस्ता नगर परिषदेच्या कागदोपत्री 15 मीटरचा असला तरी प्रत्यक्षात तो साडेआठ मीटरचा आहे. त्यामुळे बाजारपेठेचा वाढता विस्तार लक्षात घेता तो कमी पडत असून यामुळे सातत्याने शहरात वाहतूक कोंडी होताना दिसते. त्याचा मोठा त्रास ग्राहकांना होतो. सणांच्यावेळी तर चालणेही कठीण बनते. यामुळे अनेकदा अशावेळी एसटी बसेससह मोठी वाहने बायपास मार्गे वळवावी लागतात.  सध्या रस्त्याला गटारचे नसल्याने पावसाळय़ात पाणी रस्त्यावरच साठते. त्याचा त्रास व्यापाऱयांसह नागरिकांना बसतो. हा रस्ता काही व्यापाऱयांच्या शेड व अन्य प्रकारच्या अतिक्रमणामुळे वाढवणे आजतागायत शक्य झालेले नाही.

त्यामुळे नगर परिषदेने आपल्याकडे असलेल्या नोंदीप्रमाणे हा रस्ता नगर परिषद ते भेंडीनाक्यापर्यंत 15 मीटरचा करण्याचा निर्णय घेतला आहे. चिंचनाका ते नगर परिषदेपर्यंतचा रस्ता यापूर्वीच असलेली सर्व अतिक्रमणे तोडून मोठा करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात आता वाहतूककोंडी किंवा कोणत्याही प्रकारची गर्दी होताना दिसत नाही. यामुळे शहरातील रस्ता रूंदीकरणाबाबत व्यापाऱयांचे नेमके मत काय हे जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत व्यापाऱयांची मतेही प्रशासनासह नगराध्यक्षा सुरेखा खेराडे जाणून घेणार आहेत. यानंतर रस्ता व बाजूने गटार या कामांची अंदाजपत्रके तयार करून त्याला तांत्रिक मंजुरी घेऊन कामाला सुरूवात केली जाणार असल्याचे समजते.

Related posts: