|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » डॉ.चोरगेंचा संघर्षमय जीवनपट उलगडणार !

डॉ.चोरगेंचा संघर्षमय जीवनपट उलगडणार ! 

राजेंद्र शिंदे/ चिपळूण

 जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे हे कोकणातील राजकारण, समाजकारण, कृषी, सहकार आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातील एक अग्रेसर व्यक्तिमत्व आहे. सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील सूक्ष्म निरीक्षण आणि परखडपणा ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्टय़े आहेत. ‘झेप’ या नऊशे पानांच्या आत्मचरित्रातून त्यांचा 66 वर्षातील संघर्षमय जीवनपट उलगडणार आहे. 23 डिसेंबर रोजी या आत्मचरित्राचे पुणे येथे प्रकाशन होत आहे.

  एक सर्वसामान्य माणूस ते उच्चविद्या-विभूषित, जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष, कोकणातील मोठय़ा शिक्षण संस्थेचे संस्थापक, कला, क्रीडा, सहकार, साहित्य, शिक्षण व कृषी यामध्ये भरीव कामगिरी करणारे आणि चाळीसहून अधिक ललित पुस्तकांचे लेखक, कादंबरीकार असा अत्यंत कष्टाने प्रवास करून देदीप्यमान यश मिळवणाऱया डॉ. चोरगे यांचा जीवनपट उलगडणारा ‘झेप’ मधून वाचकांसमोर येत आहे. दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. च्या माध्यमातून पुणे येथील नवी पेठमधील एस. एम. जोशी सभागृहात सायंकाळी 6.15 वाजता या आत्मचरीत्राचे प्रकाशन होत आहे. कृषितज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया या प्रकाशन सोहळय़ास पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष आमदार पाशा पटेल, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे, मधुमिता बर्वे, मधुर बर्वे उपस्थित राहणार आहेत.

  कोल्हापूर जिल्हय़ातील भुदरगड तालुक्यातील गारगोटीजवळील पुष्पनगरचे असलेले डॉ. चोरगे हे वयाच्या 24व्या वर्षी कोल्हापूर येथून बीएस्सी व राहुरी कृषी विद्यापीठातून एमएस्सी ऍग्री अभ्यासक्रम पूर्ण करून कोकणात आले. सुरूवातीला दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक, त्यानंतर सावर्डे व पुन्हा नंतर राहुरी विद्यापीठात क्रीडाधिकारी म्हणून सेवा बजावली. सेवा बजावताना उद्भवलेला प्रांतवाद यातूनच मग तक्रारी, चौकशी काहीवेळा निलंबन अशा संघर्षालाही तोंड द्यावे लागले. पुढे ते अमेरिकेलाही गेले. तेथे शिक्षण घेत असतानाच मिळालेल्या त्यावेळच्या 5 हजार डॉलरवर मांडकी-पालवण येथे जागा घेऊन विद्यानगरी उभारली. यामध्ये स्व. गोंविदराव निकम यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले.

   आपल्या महाविद्यालयीन जीवनात कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती, वेट लिफ्टींग, मल्लखांब या क्रीडाप्रकारात सहा वर्षे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करून विद्यापीठाला अनेक बक्षिसे मिळवून दिली आहेत. तसेच व्यावसायिक नाटकात कामे करून आपल्या अभिनयाचाही ठसा उमटवलेला होता. साहित्य क्षेत्रात त्यांच्या नावावर तेरा कादंबऱया, चार नाटके, चार कथासंग्रह, एक एकांकिका आणि कृषि व सहकार क्षेत्रांवर आधारित सतरा पुस्तके आहेत. त्यांच्यासह पुस्तकांनाही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राजकीय क्षेत्रातही ते ओढले गेले. कृषि, अर्थशास्त्र आणि आर्थिक क्षेत्राचा अत्यंत चांगला अभ्यास असल्याने त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेसह सहकार, विद्यापिठ कार्यकारिणीवर पदे भूषवली. डबघाईस आलेली जिल्हा मध्यवर्ती बँक धोरणात्मक निर्णय घेत प्रगतीपथावर आणली 

  चोरगे यांचे आता प्रकाशित होणारं ‘झेप’ हे आत्मकथन चाळीसावे पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी बालपण, शालेय, महाविद्यालयीन ते आतापर्यंतचा प्रवास मांडलेला आहे. त्यांचे हे आत्मकथन स्वत:पुरते मर्यादित नाही, तर शून्यातून विश्व निर्माण करताना केलेला संघर्ष, वेळी-अवेळी सत्यासाठी आप्तेष्टाविरूद्ध केलेला संघर्ष, कृषि महाविद्यालय स्थापण्यासाठीचा हेतू आणि धडपड, सहकार आणि राजकारणात आलेले बरेवाईट अनुभव, आपले पंख छाटण्यासाठी आपल्याच जवळच्या माणसांनी केलेले प्रयत्न आणि न डगमगता त्यातून खंबीरपणे वाट तुडवत घेतलेली ‘झेप’ याचे प्रत्ययकारी वास्तववादी व निर्भीड चित्रण या आत्मकथनात मांडले आहे.

 

Related posts: