|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » वैयक्तिक माहिती देताना सावधानता बाळगा : अश्विनी पाटील

वैयक्तिक माहिती देताना सावधानता बाळगा : अश्विनी पाटील 

ऑनलाईन टीम / पुणे :  
अकाउंट हॅकद्वारे फसवणुकीपेक्षा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना दिल्याने होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच महिलांनी भावनिक होऊन वैयक्तिक माहिती शेअर करु नये, असे सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील यांनी सांगितले. 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय तसेच सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर गुन्हे आणि महिला सुरक्षा’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
पाटील म्हणाल्या, महिला सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन दक्ष असून संकटसमयी महिलांनी न घाबरता पोलीस प्रशासनाशी वेळेत संपर्क साधल्यास त्यांच्यापर्यंत तात्काळ मदत पोहचू शकते. आपणा सर्वांची फसवणूक मॅट्रीमोनिअल साइट, फेसबुक, व्हॉट्स ॲप, इन्स्टाग्राम माध्यमातून होते. यामध्ये शाळकरी मुलींपासून ते प्रौढ महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यासाठी महिलांनी दक्ष राहण्याबरोबरच मनाने खंबीर राहणे गरजेचे आहे. आपल्या हातून काही गंभीर चूक घडली आहे असे वाटून आपल्याकडून ती लपविली जाते. त्यातून अनेक चुका आपण करत जातो. त्यामुळे वेळीच आपल्या घरच्यांना विश्वासात घेऊन याची माहिती दिल्यास तसेच पोलिसांशी संपर्क साधल्यास या गोष्टींना वेळीच चाप बसविणे शक्य होते.
पोलीस उपनिरीक्षक प्रिया टिळेकर यांनी महिलांनी स्वत:चे संरक्षण करण्याबाबतच्या विविध युक्ती सांगितल्या. त्या म्हणाल्या, महिलांच्या मदतीला पोलीस यंत्रणा तर आहेच, परंतु पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत समोरच्या व्यक्तीपासून बचाव करण्यासाठी युट्युबवर अनेक युक्त्या सुचविल्या आहेत. तसेच सेफ्टी पीन ॲप, रक्षा ॲप, विथ यु सारखे महिला संरक्षणासाठीचे ॲप आहेत. त्याचबरोबर 1091 क्रमांकावर फोन केल्यास दामिनी पथक तसेच 100 क्रमांकाची हेल्पलाईन आहे. संकटकाळात महिलांनी याचा फायदा घ्यायला हवा, जेणेकरुन तात्काळ मदत मिळू शकेल.
डॉ. तांबट म्हणाले, बदलत्या काळानुसार महिलांशी संबंधित गुन्ह्यांचे स्वरुपही बदलत आहे. यासाठी महिलांनी स्वत:मध्ये आवश्यक ते बदल करुन समाजात आत्मविश्वासाने वावरायला हवे. 
 

Related posts: