|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » क्रिडा » 1987 नंतर प्रथमच न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात ‘बॉक्सिंग डे’ कसोटी

1987 नंतर प्रथमच न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात ‘बॉक्सिंग डे’ कसोटी 

1 लाख प्रेक्षकक्षमतेच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर उद्यापासून रोमांच अपेक्षित

मेलबर्न / वृत्तसंस्था

तेजतर्रार, जलद गोलंदाजीचा मारा करण्यात माहीर असलेल्या ट्रेंट बोल्टच्या समावेशामुळे जणू हत्तीचे बळ संचारलेल्या न्यूझीलंडची उद्यापासून (दि. 26) यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘बॉक्ंिसग डे’ कसोटी होत आहे. या निमित्ताने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर तब्बल 30 वर्षांनंतर प्रथमच या दोन संघांत एखादी बॉक्सिंग डे कसोटी होईल, हे या लढतीचे ठळक वैशिष्टय़ असणार आहे.

ट्रेंट बोल्ट यापूर्वी साईड स्ट्रेनमुळे पर्थमधील पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही आणि न्यूझीलंडचा त्या सामन्यात तब्बल 296 धावांनी फडशा पडला होता. पण, या कसोटी सामन्यासाठी बोल्ट पूर्ण तंदुरुस्तीसह मैदानात उतरणे अपेक्षित असून त्याच्या तेजतर्रार माऱयावरच किवीज संघाची भिस्त असणार आहे. 1 लाख प्रेक्षकक्षमतेच्या या स्टेडियमवर दोन्ही संघांचा चांगलाच कस लागेल, अशी अपेक्षा आहे.

किवीज चाहत्यांसाठी जादा फ्लाईट

न्यूझीलंडच्या चाहत्यांना या लढतीचे विशेष आकर्षण असून त्यांनी हजारो तिकीटे विकत घेतली आहेत. त्यांच्यासाठी ऑकलंड ते मेलबर्नच्या जादा विमान फेऱयाही आयोजित केल्या गेल्या असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी, न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात 1987 मध्ये शेवटची बॉक्ंिसग डे कसोटी खेळवली गेली होती. महान जलद गोलंदाज रिचर्ड हॅडली यांच्या तिखट माऱयानंतरही यजमान संघाने ती कसोटी अनिर्णीत राखण्यात यश संपादन केले होते. आश्चर्य म्हणजे सध्याच्या दोन्ही संघातील काही युवा खेळाडूंचा त्यावेळी जन्मही झालेला नव्हता.

गुरुवारपासून खेळवल्या जाणाऱया या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी कोणत्या प्रकारची खेळपट्टी उपलब्ध करुन दिली जाईल, याबद्दल सर्व माहिती गुलदस्त्यातच आहे. पण, आश्चर्य म्हणजे एकाच दिवसापूर्वी शेफिल्ड शील्ड प्रथमश्रेणीतील येथील एक लढत धोकादायक पिचमुळे रद्द करावी लागली होती. ग्राऊंड क्युरेटर मॅट पेज  त्यानंतर नवी पिच तयार करण्यात व्यस्त होते.

ऑस्ट्रेलिया हॅझलवूडशिवाय खेळणार

3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील या दुसऱया लढतीत यजमान ऑस्ट्रेलियाला जोश हॅझलवूडशिवाय खेळावे लागणार आहे. हॅझलवूड पर्थमधील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला. पॅट कमिन्स व मिशेल स्टार्क यांच्यासह जेम्स पॅटिन्सन आता संघात दाखल होईल, असे संकेत आहेत.

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये ऍशेस राखल्यानंतर या हंगामात घरच्या भूमीतील तिन्ही कसोटी सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांचा वारु रोखणे न्यूझीलंडसाठी अर्थातच आव्हानात्मक ठरणार आहे. स्टार्क व मेहनती फिरकीपटू नॅथन लियॉन उपयुक्त योगदान देत आले असून तिसऱया स्थानावर मार्नस लाबुशाने हे संघासाठी नवे फाईंड ठरले आहे. 25 वर्षीय लाबुशानेने पर्थमधील पहिल्या डावात तडफदार शतक झळकावले होते. त्याचे हे सलग तिसरे शतक ठरले. दुसऱया डावातही त्याने अर्धशतकी खेळी साकारली होती.

डेव्हिड वॉर्नर पूर्ण तंदुरुस्त

मागील आठवडय़ात सराव सत्रादरम्यान एक चेंडू डेव्हिड वॉर्नरच्या हातावर आदळल्याने ऑस्ट्रेलियन गोटात चिंतेचे वातावरण जरुर होते. पण, वॉर्नर या लढतीसाठी पूर्ण तंदुरुस्त असेल, असा निर्वाळा संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी दिला आहे.

संभाव्य संघ

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, जो बर्न्स, मार्नस लाबुशाने, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ट्रव्हिस हेड, टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, नॅथन लियॉन, जेम्स पॅटिन्सन, मायकल नेसर, पीटर सिडल.

न्यूझीलंड : टॉड ऍसल, टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डे ग्रँडहोम, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, जीत रावल, मिशेल सॅन्टनर, टीम साऊदी, रॉस टेलर, बीजे वॅटलिंग, नील वॅग्नर, केन विल्यम्सन.

सामन्याची भारतीय प्रमाणवेळ : पहाटे 5.30 पासून. (गुरुवार दि. 26)

Related posts: