|Thursday, February 20, 2020
You are here: Home » solapur » खेळामध्ये भारताला आघाडीवर नेण्यासाठी युवा ऊर्जा खर्ची घाला : राज्यपाल कोश्यारी

खेळामध्ये भारताला आघाडीवर नेण्यासाठी युवा ऊर्जा खर्ची घाला : राज्यपाल कोश्यारी 

प्रतिनिधी / सोलापूर

खेळात एक वेगळी ऊर्जा आहे. खेळामुळे शरीर स्वास्थ्य उत्तम राहते. दुर्दैवाने खेळ क्षेत्रात भारत मागे आहे. ऑलिंपिकमध्ये भारताला पदक कमी मिळतात. त्यामुळे युवा खेळाडूंनी सराव तसेच परिश्रम करत आपली ऊर्जा खर्ची घालत जागतिक पातळीवर खेळ क्षेत्रात देशाला पुढे घेऊन जावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. गुरुवारी, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय 23 व्या आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी प्र कुलगुरू डॉ. विकास कदम, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी क्रीडा विभागाचे संचालक डॉ. सुरेश पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, आज पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे सुंदर नियोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी सोलापूर जिह्यातील देणगीदारांनी भरीव मदत केली आहे, ही आनंदाची बातमी आहे. यामुळे खेळाडूंचा उत्साह निश्चितच वाढेल. खेळात व आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी लक्ष्य केंद्रित करणे आवश्यक आहे. परिश्रमही खूप महत्त्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी व शरीर स्वास्थ्य उत्तम ठेवण्याकरिता योग आणि ध्यान करणे गरजेचे आहे. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्त्व विशद करून जागतिक पातळीवर 21 जून रोजी योग दिन साजरा करण्यास सुरुवात केली. विद्यार्थी खेळाडूंनीही नियमित योग व ध्यान करावे, असे आवाहन यावेळी केले.

कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी क्रीडा महोत्सवाची माहिती दिली. विद्यापीठाकडे एकही क्रीडांगण उपलब्ध नसताना आज विद्यापीठाने विविध 15 क्रीडांगणे आंतरराष्ट्रीय दर्जाची तयार केली आहेत. यासाठी जिह्यातील देणगीदारांनी मोठी मदत केली आहे. सीएसआर फंडातून काही क्रीडांगणे साकारली आहेत, असेही त्यांनी सांगितले. आता क्रीडा महोत्सवातील सर्व खेळाडू विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आरोग्य पुस्तिका दिली जाणार असल्याची माहिती यावेळी दिली. या महोत्सवासाठी माजी विद्यार्थ्यांचेही ऑनलाइन नोंदणीसाठी सहकार्य लाभल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले. प्रारंभी 20 विद्यापीठाच्या संघांचे मार्च पास झाले. क्रीडा ज्योतीचे स्वागत करण्यात आले. 30 डिसेंबर पर्यंत चालणाऱया या क्रीडा महोत्सवात साडेतीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली व प्रा. रेवा कुलकर्णी यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी मानले.

महाराष्ट्रात मराठी बोलता येणे गरजेचे

आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात या महोत्सवाचे सूत्रसंचालन संस्कृत भाषेतून करण्यात आले, ही फार आनंदाची बाब आहे. याच बरोबर या विद्यापीठात विविध भाषा शिकवले जाते, ही चांगली गोष्ट आहे. सर्वांना विविध भाषा येणे आवश्यक आहे. मी पण मराठी शिकलो. महाराष्ट्रात मराठी बोलता येणे गरजेचे असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

3 वाजल्यापासून विविध स्पर्धेस सुरूवात

क्रीडा महोत्सवाच्या उद्घटनानंतर दुपारी 3 वाजल्यापासून विविध स्पर्धेला सुरूवात झालेली आहे. खो-खो, हॅन्डबॉल, व्हॉलीबॉल यासह विविध खेळात विद्यार्थी मोठय़ा उत्साहाने स्पर्धेत आपली चमकदार कामगिरी बजावत आहेत. एकापेक्षा एक खेळात मोठी चुरस पहावयास मिळत आहे. स्पर्धा बघण्यासाठी खेळाडू व सोलापूकरांनी मोठी गर्दी केली होती.

Related posts: