|Thursday, February 20, 2020
You are here: Home » solapur » भारत जगात तिसरी आर्थिक ताकद बनण्याच्या तयारीत

भारत जगात तिसरी आर्थिक ताकद बनण्याच्या तयारीत 

प्रतिनिधी / सोलापूर

मागील 70 वर्षात देश प्रगती करत आहे. या पाच वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेची पाच ट्रिलीयनकडे वाटचाल सुरू आहे. भारत जगात तिसरी आर्थिक ताकद बनण्याच्या तयारीत आहे. याचा आपणही एक हिस्सा बनून देशाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी सहभागी होणे गरजेचे आहे, असे मत कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

  पुण्यश्लाक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा पंधरावा दीक्षांत समारंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या प्रांगणात 27 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता झाला. यावेळी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यस्थानी कुलगुरु डॉ.मृणालिनी फडणवीस होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. विकास कदम, कुलसचिव डॉ. विकास घुटे, अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

  दीक्षांत समारंभाच्या सुरवातीला परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शाह हे ज्ञानदंड घेऊन व्यासपीठावर आले. त्यानंतर राष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीताने समारंभास सुरवात झाली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते 11 हजार 427 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 6 हजार 92 विद्यार्थी उपस्थित तर 5 हजार 335 विद्यार्थ्यांनी अनुपस्थित राहून पदवी ग्रहण केली. तसेच 80 विद्यार्थ्यांना पीएच डी. पदवी आणि 54 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देवून गौरविण्यात आले.

  राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ही पदवी म्हणजे शिक्षणाचा शेवट नाही, तर तुमची जबाबदारीने शिकण्याची नवी सुरूवात आहे. या विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा, शिक्षणाचा उपयोग देश हितासाठी करावा. देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. आज देश माहिती व तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडीवर आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासारखे मिसाईल मॅन भारतात जन्मले. विद्यार्थ्यांनी आता विशिष्ट ध्येय व लक्ष ठेवून नवा भारत निर्माण करण्यासाठी सज्ज राहावे. प्रयत्नामध्ये सातत्य हवे, व्यापकता व विशालता हवी. त्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी केले.

  कुलगुरु डॉ. फडणवीस म्हणाल्या, विद्यापीठाने विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी 90 कौशल्य अभ्यासक्रम सुरु करुन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद, पेटंट, कॉपीराईट्सचे आदी काम विद्यापीठाकडून सुरु आहे. इतर राज्यातील विद्यार्थी आपल्या वाद्यपीठात येत असल्याने येथे भाषा विभाग सुरु करुन कन्नड, पाली, संस्कृत, ऊर्दू भाषेचे शिक्षण उपलब्ध करुन दिले आहे. विदेशी विद्यापीठांशी करार करुन शाश्वत विकासावर अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रेवा कुलकर्णी व प्रा. ममता बोल्ली यांनी केले. राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली.

तर मराठी बोलले पाहिजे

आपण महाराष्ट्रामध्ये राहत आहेत तर मराठी बोलले पाहिजे. येत नसेल तर मराठी शिकाले पाहिजे. मातृभाषेचा सम्मान करा आणि अभिमान बाळगायला शिकले पाहिजे आणि त्यानंतर मातृभाषेनंतर इतर भाषा देखील शिकली पाहिजे, असे मत दीक्षांत समारंभात राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केले.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले

-सर्वात मोठे सुवर्णपदक अशोकचक्र आहे.

-प्रत्येक क्षेत्रात मुली तीनपट जास्त व पुढे आहेत.

-पुन्हा देशाला जगत्गुरू बनवायचे आहे.

-आपण भविष्याचे निर्माते आहोत.

-उच्च लक्ष असल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.

-यश मिळाल्यास जास्त आनंदी आणि अपयश मिळाल्यास जास्त दुःखी होऊ नये.

-डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, टाटा-बिर्ला हे मोठय़ा घरात जन्माला आले नसताना  ते यशाचे शिखर गाठू शकले.

-जोपर्यंत ध्येय निश्चीत नसेल तोपर्यंत काही प्राप्त करू शकत नाही.

Related posts: