|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भाजपाचा सभापती आज चिठ्ठीतून ठरणार

भाजपाचा सभापती आज चिठ्ठीतून ठरणार 

प्रतिनिधी / मिरज

मिरज पंचायत समितीचा सभापती आज सोमवारी चिठ्ठय़ा टाकून निश्चित केली जाणार आहे. त्यासाठी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेशभाऊ खाडे आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थिती भाजपा सदस्यांची बैठक घेतली जाणार आहे. दरम्यान, उपसभापती पदासाठी राहुल सकळे यांचे नाव सत्ताधारी भाजपाने निश्चित केले आहे. चिठ्ठी प्रक्रियेच्या विरोधात बंडाचा इशारा देणाऱया सौ. शुभांगी सावंत आणि किरण बंडगर यांच्या तलवारी खासदारांसमोर म्यान झाल्या.

मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज 30 डिसेंबरला निवडणूक होत आहे. यासाठी सत्ताधारी भाजपा आणि विरोधी महाआघाडीने गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी केली आहे. सभापती पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने सत्ताधारी भाजपाकडे सौ. शुभांगी सावंत, सौ. सुनिता पाटील, सौ. गीतांजली कणसे आणि सौ. त्रिशैला खवाटे या चार महिला इच्छुक आहेत. सभापती आणि उपसभापती निवडीवरुन खासदार आणि दोन्ही आमदारांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत एकमत होऊ शकले नाही.

आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत सभापती पदासाठी सौ. शुभांगी सावंत आणि उपसभापती पदासाठी राहूल सकळे यांचे नाव निश्चित झाले होते. दरम्यान, खासदार संजयकाका पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या सदस्यांच्या बैठकीत उपसभापती म्हणून राहुल सकळे यांचे नाव निश्चित झाले. पण, बऱयाच वादानंतर सभापती मात्र, चिठ्ठय़ा टाकून निवडला जाण्यावर एकमत झाले. हा निर्णय अमान्य झाल्याने सौ. शुभांगी सावंत आणि किरण बंडगर यांनी भाजपा सोडण्याचा इशारा दिला होता.

आज पुन्हा खासदार पाटील यांच्या उपस्थितीत सदस्यांची बैठक झाली. त्यामध्ये सौ. सावंत आणि बंडगर यांनी आपल्या बंडाच्या तलवारी म्यान केल्या. आजच्या चर्चेतही उपसभापती पदासाठी सकळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. तर सभापती पदासाठी इच्छुक चार महिलांमध्ये चिठ्ठी टाकून निवड करण्याच्या निर्णयावर एकमत झाले. त्यामुळे उद्या सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात खासदार संजय पाटील, आमदार सुरेशभाऊ खाडे आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व सदस्यांसमवेत चिठ्ठी टाकली जाणार आहे. यातून जे नाव निश्चित होईल, त्यांचा आणि राहुल सकळे यांचा अर्ज भाजपाकडून दाखल केला जाणार आहे.

दरम्यान, महाआघाडीनेही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा शेवटच्या क्षणापर्यंत भाजपामधील नाराजांवर डोळा होता. पण, भाजपा नेत्यांच्यासमोर सर्वांच्या बंडाळ्या शमल्या. त्यामुळे महाआघाडीच्या नेत्यांनी निवडणूक बिनविरोध न करता लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडून सभापती पदासाठी सौ. जयश्री डांगे आणि उपसभापती पदासाठी सतीश कोरे यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज या नावावर मात्र निश्चिती झालेली नव्हती.

Related posts: