|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीत सभापती निवडीत भाजपाच अव्वल

सांगलीत सभापती निवडीत भाजपाच अव्वल 

प्रतिनिधी / सांगली

 राज्यात महाविकास आघाडीच्या यशस्वी पॅटर्ननंतर उत्सुकता लागलेल्या पंचायत समिती सभापती निवडीत मात्र जिल्हय़ात भाजपाने हा फॉर्म्यूला चालू दिला नाही.  दहा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत जत, कवठेमहांकाळ, मिरज, पलूस, कडेगाव आणि आटपाडीत भाजपाने आपली सत्ता कायम राखली. तर वाळवा, शिराळा आणि तासगाव पंचायत समितीवरील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. खानापूर पंचायत समिती सेनेने आपल्याकडेच ठेवली.

  कवठेमहांकाळमध्ये मात्र राष्ट्रवादीचे बहुमत असतानाही खा. संजयकाका पाटील गटाने धक्का देत सभापतीपद भाजपाकडे खेचून आणले. राष्ट्रवादीने माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना धक्का देत भाजपाशी हातमिळवणी केली. †िशराळा पंचायत समितीचे सभापतीपद अडीच वर्षाच्या फॉर्म्यूल्यानुसार काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे आले.

 राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी महाविकास आघाडी निर्माण झाल्याने स्थानिक पातळीवरही त्याचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे सोमवारी होणाऱया सभापती निवडीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. येथेही महाआघाडीचा फॉर्म्यूला यशस्वी करण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली होती. पण स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला नसल्याचे स्पष्ट झाले. खानापूर पंचायत समिती वगळता जिह्यातील कोणत्याही पंचायत समितीमध्ये सेनेचे सदस्य नाहीत.कवठेमहांकाळ मध्ये अजितराव घोरपडे यांचे तीन सदस्य आहेत. पण ते पूर्वी राष्ट्रवादीबरोबर आघाडीत निवडून आले होते.  त्यामुळे बहुतांशी ठिकाणी भाजपा विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी अशाच लढती झाल्या.

  अडीच वर्षात जत, मिरज, पलूस, कडेगाव आणि आटपाडी पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता होती. परंतु पक्षांतर्गत गटबाजीमुळे मिरज आणि जतमध्ये सत्तांत्तर होण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. जतमध्ये माजी आमदार विलासराव  जगताप यांच्या प्रयत्नाने तर मिरजेत खा. संजयकाका पाटील आणि आ. सुरेश खाडे यांनी ऐनवेळी सामंजस्याची भूमिका घेतल्याने सत्ता कायम ठेवली.

 जत पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण होते. माजी आ. विलासराव जगताप यांच्या पुत्र मनोज यांना सभापतीसाठी विरोध दर्शविण्यात आला होता. मात्र जगतापांनी मुत्सद्देगिरीने सभापतीपदी मनोज आणि उपसभापती विष्णू चव्हाण यांच्या निवडी करत आपली सत्ता कायम ठेवली.

   मिरजेत आमदार, खासदार गटाची एकी

 मिरजेचे सभापतीपद सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित होते. मालगावच्या  शुभांगी सावंत यांची सभापतीपदी तर नांद्रेच्या राहुल सकळे यांची उपसभापतीपदी निवड झाली. भाजपातील बेबनावाचा लाभ उठवून काँग्रेस-राष्ट्रवादीकडून भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पण ऐनवेळी खा.संजय पाटील आणि आ. सुरेश खाडे यांनी सामोपचाराने घेत  बारा सदस्यांच्या संख्याबळावर सत्ता टिकवून ठेवण्यात यश आले.

  पलूस आणि कडेगाव पंचायत समितीमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सत्ता कायम राखली. पलूसमध्ये भाजपाचे दीपक मोहिते यांची सभापतीपदी तर राष्ट्रवादीचे अरुण पवार  यांची उपसभापती बिनविरोध निवड झाली. येथे भाजपा आणि राष्ट्रवादीची आघाडी कायम राहिली. तर कडेगाव पंचायत समितीचे सभापतीपदी भाजपाच्या मंगल क्षीरसागर यांची सभापतीपदी वर्णी लागली. आटपाडीतही माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख आणि गोपिचंद पडळकर यांची सत्ता आहे. डॉ. भूमिका बेरगळ यांची सभापतीपदी तर रुपेश पाटील यांची उपसभापती वर्णी लागली.

 कवठेमहांकाळ पंचायत समितामध्ये राष्ट्रवादीचे चार, अजितराव घोरपडे गट तीन आणि खा. संजयकाका गटाचा एक सदस्य आहे. राष्ट्रवादीने घोरपडे गटाची साथ सोडून खासदार गटाशी आघाडी केली. त्यांचे एकमेव सदस्य असलेले विकास हाके यांची सभापतीपदी वर्णी लागली. तर राष्ट्रवादीच्या नीलम पवार यांना उपसभापतीपद मिळाले. शिराळा पंचायत समितीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. अडीच-अडीच वर्षे सभापतीपद घेण्याचे ठरले होते. पहिले अडीच वर्षे काँग्रेसकडे सभापतीपद होते. उर्वरित सव्वादोन वर्षासाठी राष्ट्रवादीच्या वैशाली माने यांची सभापतीपदी तर काँग्रेसचे पी. वाय. पाटील (सत्यजित देशमुख गट) यांची उपसभापतीपदी निवड झाली. येथेही भाजपा राष्ट्रवादीची आघाडी कायम राहिली.

  वाळवा आणि तासगावमध्ये राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली. वाळव्यात  शुभांगी पाटील यांची सभापतीपदी तर वाळव्याचे नेताजी पाटील यांची उपसभापतीपदी फेरनिवड झाली. तासगावमध्ये कमलताई पाटील यांची सभापतीपदी तर शुंभागी पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

खानापूर पंचायत समितीत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांची एकहाती सत्ता आहे.  मारुती शिंदे यांची सभापतीपदी तर उपसभापतीपदी सारीका माने  यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर आता जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीकडे लक्ष लागले आहे.

Related posts: