|Saturday, February 29, 2020
You are here: Home » क्रिडा » वर्षअखेरीस कोहलीचे अग्रस्थान कायम

वर्षअखेरीस कोहलीचे अग्रस्थान कायम 

आयसीसी कसोटी मानांकनात पुजाराची पाचव्या स्थानी घसरण

वृत्तसंस्था/ दुबई

भारतीय कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या मानांकनात अग्रस्थानी राहूनच वर्षाची अखेर करणार आहे. मात्र कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.

कोहलीने 928 मानांकन गुण मिळविले असून दुसऱया स्थानावरील ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथपेक्षा तो 17 गुणांनी पुढे आहे. स्मिथने 911 गुण मिळविले असून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन 822 गुणांसह तिसऱया, ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशाने चौथे स्थान पटकावले आहे. या वर्षातील 11 कसोटीत लाबुशानेने 1085 धावा जमविल्या. 2019 मध्ये कोहली 274 दिवस अग्रस्थानावर होता तर स्मिथने 91 दिवस या स्थानावर कब्जा केला होता. पुजारा 791 गुणांसह पाचव्या तर अजिंक्य रहाणे 759 गुणांसह संयुक्त सातव्या स्थानावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 95 धावांचे योगदान दिलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या क्विन्टॉन डी कॉकने संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. या कामगिरीने क्रमवारीत त्याला टॉप टेनमध्ये स्थान मिळाले आहे.

गोलंदाजीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह 794 गुणांसह सहाव्या स्थानावर स्थिर राहिला आहे तर स्पिनर आर. अश्विन (772) व वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (771) नवव्या व दहाव्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स अग्रस्थानी असून त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱया कसोटीत 5 बळी मिळविले. 321 दिवसांपासून तो अग्रस्थानावर आहे तर या वर्षाची सुरुवात अग्रस्थानाने करणाऱया द.आफ्रिकेच्या रबाडाने 44 दिवस अव्वल स्थान मिळविले होते. फिलँडरने तीन स्थानांची प्रगती केली असून तो आता पाचव्या स्थानावर आहे. इंग्लंडचे त्रिकुट ब्रॉड 14 व्या, जोफ्रा आर्चर 40 व्या, स्रम करन 45 व्या स्थानावर आहे. या सर्वांनी प्रगती केली आहे. जेम्स पॅटिन्सननेही एकदम 46 स्थानांची प्रगती केली असून तो आता 54 व्या स्थानावर विसावला आहे.

अष्टपैलूंमध्ये विंडीजच्या जेसॉन होल्डरने अग्रस्थानावर वर्षअखेर केली असून तो एकूण 342 दिवस या स्थानावर होता. बांगलादेशचा शकीब अल हसन 23 दिवस या स्थानावर होता.

आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धची दुसरी कसोटी जिंकून 40 गुण घेत दुसरे स्थान आणखी भक्क केले आहे. त्यांचे एकूण 256 गुण झाले असून मालिका संपल्यानंतर कदाचित ते 296 गुणांवर असतील. द.आफ्रिकेने चॅम्पियनशिपमधील पहिला विजय मिळवित 30 गुण मिळविले आहेत. न्यूझीलंड व इंग्लंड अनुक्रमे 60 व 56 गुणांवर कायम राहिले आहेत. कसोटी चॅम्पियनशिपमधील प्रत्येक मालिकेत 120 गुण ठेवण्यात आले असून मालिकेतील सामन्यानुसार ते विजयी संघाला दिले जातात. दोन कसोटींच्या मालिकेत एका कसोटीला 60 तर पाच कसोटींच्या मालिकेत एका कसोटीला 24 गुण दिले जातेत. जून 2021 मध्ये या चॅम्पियनशिपची अंतिम लढत अव्वल राहणाऱया दोन संघांत होणार आहे.

Related posts: