|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » संवाद » चला, सकारात्मक राहू!

चला, सकारात्मक राहू! 

आजपासून 2020 या नवीन वर्षाचा प्रारंभ होत आहे. गेलं वर्ष हे अनेक उपक्रमांचे आणि आव्हानांचे ठरले. देशात अनेक महत्वाच्या घटना घडल्या, तशाच या आपल्या भागात घडल्या. दोन वर्षांपूर्वी झालेली नोटाबंदी आणि त्यानंतर आलेली जीएसटी यामुळे उद्योग व्यवसायावर बराच विपरीत परिणाम झाला, अशी अनेकांची तक्रार आहे. पण येणाऱया काळात त्यावर मात होईल आणि आपण पुन्हा प्रगतीकडे धीमे पणाने  का होईना पण निश्चितच वाटचाल करू, असा विश्वास वाटतो.

आगामी काळ हा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्यासारखा आहे. आपण नव वर्षात पदार्पण करताना नेहमीच अनेक योजना आखतो पण काही दिवस गेले की ते विसरून जातो पण यापुढे तसे करून चालणार नाही. आपण एखादी योजना करून जर नियोजनबद्धरीत्या ती कार्यान्वित  करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला निश्चितच यश मिळू शकते. त्यासाठी हवी जिद्द. खास करून तरुण पिढीने अशा पद्धतीने कार्य केले तर ही पिढी निश्चितच यशस्वी होईल, असा मला विश्वास वाटतो.

आता साठ वर्षे पूर्ण केलेली अनेक माणसे निवृत्तीनंतर काय करावे, या संभ्रमात असतात. कारण त्यांच्यातील अनेकांची मुले परगावी किंवा परदेशात स्थिरस्थावर झालेली असतात. त्यामुळे वेळ कसा व्यतित करावा, असा यक्षप्रश्न अनेकांच्या समोर उभा राहतो पण याही साठीतल्या तरूणानी जर आपल्या वेळेचे योग्य वेळापत्रक तयार केले तर त्यांना आपला वेळ कसा गेला, हे कळणारच नाही. दिवसेंदिवस आनंदात वेळ घालविला तर तब्येत तर चांगली राहीलच पण त्यांचा इतरांनाही चांगला फायदा होईल. मला असे वाटते रोज सकाळी एक तासभर नियमित फिरणे, अर्धाएक तास प्राणायाम करणे, शरीरात झेपेल असा छोटासा व्यायाम करणे, वृत्तपत्र वाचणे, आपल्या या आयुष्यात वेळेअभावी पूर्ण न झालेल्या ज्या काही छोटय़ा-मोठय़ा इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे अशा अनेक गोष्टी करता येतात. आज शहरामध्ये विविध संस्था आणि संघटना आपले उपक्रम राबवत असतात या उपक्रमात सहभागी होऊन आपला वेळ आनंदात घालवता येतो. पण आपल्याला अनेक नवीन मित्र मिळवता येतात. ग्रंथालयात जाऊन हव्या त्या पुस्तकांची निवड करून ती वाचता येतात. अनेक व्याख्याने व इतर उपक्रमांना उपस्थित राहून त्यांचा आस्वाद घेता येतो. चित्रलोक मूव्ही क्लब किंवा बुक लवर्स क्लब यासारख्या संघटनांचे सभासद होऊन काही कलात्मक चित्रपट पाहता येतात. सेवाभावी संस्थांना भेट देऊन आपला वेळ तिथल्या आबालवृद्धांबरोबर मजेत घालविता येतो.

  मनोरंजनाची साधने असलेल्या ठिकाणी भेटी देता येतात.  आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेत जाऊन  भेटी देता येतात. अशा एक ना अनेक गोष्टीतून  आपल्याला  आपला वेळ मजेत घालवता येतो. प्रवास  शक्मय असेल  तर लांबचा  किंवा अगदी जवळच्या ठिकाणचासुद्धा  करता येतो, असे केले की दिवस आणि महिने कसे संपले  हे समजणार नाही, याचा  सर्व ज्ये÷ांनी गंभीर विचार करावा,  असे मला वाटते.

‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ ही उक्ती लक्षात ठेवावी. प्रत्येक गोष्टीत सातत्य अतिशय महत्वाचे आहे, हे लक्षात ठेवावे. एखादी गोष्ट आपण सातत्याने केली तर त्यात निश्चितच यश मिळू शकते, हे लक्षात घ्यावे. नवीन वर्षात पदार्पण करीत असताना आपण या सर्व गोष्टींचा जरूर विचार करूया आणि आगामी वर्ष हे आनंदाचे यशस्वी जाईल, अशी आशा करुया…!

            –अनंत लाड

Related posts: