|Thursday, February 20, 2020
You are here: Home » Top News » एकनाथ खडसेंबाबतच्या मनधरणीला यश?

एकनाथ खडसेंबाबतच्या मनधरणीला यश? 

विधान परिषदेवर घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

 जळगाव / प्रतिनिधी :

पक्षावर नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपले तिकीट महाजन फडणवीस यांनी कापल्याचा आरोप केल्यानंतर शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या सांगण्यावरून जळगावला खडसे यांची भेट घेतली असून, या भेटीत खडसेंची मनधरणी केल्याचे समजते. त्याचबरोबर विधान परिषदेवर घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार असून, त्यामुळे खडसेंच्या नाराजीची तलवार पूर्णपणे म्यान होणार का, याबाबत औत्सुक्य आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना खडसे यांनी थेट गिरीश महाजन आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन पक्षश्रेष्ठी तिकीट देण्यास तयार असले, तरी यांनी तिकीट देण्यास विरोध केल्याचा थेट आरोप केला. दुसऱया दिवशी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या आरोपाचा इन्कार करत खडसेंचे तिकीट दिल्लीने तिकीट नाकारले असल्याचा खुलासा करत या मागे आपला अथवा देवेंद्र फडणवीस यांचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

ज्येष्ठ नेत्याची नाराजी पक्षाला परवडणारी नाही, याची जाणीव भाजपाला झाल्याने खडसेंच्या मनधरणीसाठी देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी जळगावला पाठवण्यात आले. वरवर पाहता फडणवीस हे नंदुरबार जिल्हय़ात जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी जळगावमार्गे जाणार असल्याचा दौरा आखला गेला. देवेंद्र फडणवीसांना खडसे भेटायला येणार असल्याचे समजल्यानंतर फडणवीसांनी अर्धा तास दौरा लांबवला. खडसे यांच्याबरोबर चर्चा करत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला गेला. खडसे, महाजन आणि फडणवीस एकत्र बसल्याचे फोटो माध्यमांपर्यंत जाण्याची पद्धतशीर व्यवस्था केली गेली. खडसेंना विधान परिषदेवर घेण्याचे मान्य करत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे भाजपा खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना विधान परिषदेवर घेणार असल्याच्या बातम्या बाहेर पडल्या. या बैठकीनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी खडसे गटाचा उमेदवार जाहीर झाला, तर निवडणुकीनंतर खडसे व महाजन यांनी एकमेकांना लाडू भरवले.

आता फडणवीस भेटीनंतर भाजपाने खडसे यांच्याबाबत घेतलेली माघार पाहता एकनाथ खडसे यांना केवळ विधान परिषदेवर न घेता प्रवीण दरेकरांकडे असलेले विरोधी पक्षनेते पद देऊन त्यांचा राग शांत केला जाऊ शकतो, असेही मानले जात आहे.

Related posts: