|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » नागरिकत्व सुधारणा कायद्याचा अपप्रचारच होतोय – अविनाश धर्माधिकारी

नागरिकत्व सुधारणा कायद्याचा अपप्रचारच होतोय – अविनाश धर्माधिकारी 

ऑनलाईन टीम / पुणे :

 नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत विरोधक जाणीवपूर्वक अपप्रचार करीत असून ज्या राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे तेथे प्रकर्षाने विरोध करण्यात येतो आहे. या विरोधामागे मतपेटीचे राजकारण आहे अशी टीका माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडल परिवारचे संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी केली आहे.

भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत ” नागरिकत्व सुधारणा कायदा, वास्तव आणि राजकारण ” या विषयावर त्यांनी पुष्प गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ विधिज्ञ ॲड. सदानंद फडके होते. व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे ,परिषदेचे शिवाजीनगर शाखा अध्यक्ष जगदीश धोंगडे ,खजिनदार अमित ठक्कर उपस्थित होते. सुरुवातीला नितीन आपटे यांनी संपूर्ण वंदेमातरम सादर केले. भारत विकास परिषदेचे प्रमुख विश्वस्त दत्ता चितळे तसेच अन्य पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी भारतीय जनता पक्षाने जाहीरनाम्यात नागरिकत्व विधेयकाचा समावेश केला होता असे स्पष्ट करून ते म्हणाले, त्यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाने आक्षेप घेतला नाही किंवा निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली नाही. त्यानंतर गतवर्षी झालेल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही याचा समावेश करण्यात आला होता. गेल्या पांच वर्षाच्या काळात राज्यसभेत बहुमत नसल्याने विधेयक संमत झाले नाही मात्र गेल्या महिन्यात लोकसभेप्रमाणे राज्यसभेत विधेयक मंजूर झाले आहे. त्यामुळे घटनात्मक दृष्ट्या हे विधेयक वैध आहे. मात्र विरोधकांनी देशाच्या काही भागात अशांतता निर्माण केली आहे असा आरोप त्यांनी केला.

नागरिकत्व हा विषय पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे असे नमूद करून ते म्हणाले, त्यामुळे सरकारने दिलेले आदेश राज्य शासनांनी पाळायला हवेत. हे विधेयक कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही . पण जे घुसखोर आहेत त्यांच्याबाबत कारवाई करायची नाही का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. म्हणूनच या विधेयकाला विरोध करणाऱ्याना उत्तर देण्यासाठी व्यापक समर्थनाची गरज असून सर्वांनी त्यासाठी संघटितपणाने उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. सुमारे सव्वा तासाच्या भाषणात श्री धर्माधिकारी यांनी काश्मिरी पंडित , समान नागरी कायदा , जीएसटी आदी विषयांवर सविस्तर विवेचन केले.

Related posts: