|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » लोप पावत चाललेल्या पादत्राणांना ‘त्याच्या’ स्टार्टअपचे व्यासपीठ

लोप पावत चाललेल्या पादत्राणांना ‘त्याच्या’ स्टार्टअपचे व्यासपीठ 

आज राष्ट्रीय युवा दिन; भूषण कांबळेच्या ‘व्हाण डॉट इन’ या संकेतस्थळावर पारंपरिक चपला उपलब्ध

चपलांचा वडिलोपार्जित व्यवसाय… बाहेरून माल घेऊन तो दुकानात आणून विकणे हा व्यवसाय होता. पण भूषण कांबळेने कारागिरांना हाताशी धरून चपला तयार करून त्या विकण्यास सुरुवात केली. पण पारंपरिक दुकानात हा व्यवसाय सुरू न करता ‘व्हाण डॉट इन’ हे ऑनलाईन शॉपिंग पोर्टल त्याने सुरू केले. त्यामुळे गावाखेडय़ात असलेले हे कारागीर आणि त्यांची कला घराघरात पोहोचली. दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या स्टार्टअपला सध्या खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने भूषण कांबळे या तरुणाच्या आगळ्यावेगळ्या स्टार्टअपचा हा प्रवास…

मुंबईत स्थायिक असलेला भूषण कांबळे हा मूळचा साताऱयातील शिरवळ गावचा. कुटुंबाचा चपला विकण्याचा व्यवसाय आहे. पण भूषण कांबळेने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर्स डिग्री पूर्ण केली. रुपारेल महाविद्यालयातून त्याने शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एचएसबीसी आणि कोटक बँकेत डेव्हलपर म्हणून काही काळ नोकरी केली. कुटुंबाचा व्यवसाय सांभाळताना त्यामध्ये वेगळे काहीतरी करण्याची तळमळ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये शिक्षण घेतल्याने ऑनलाईन पोर्टल सुरू करून महाराष्ट्रातील अस्सल पारंपरिक चपलांना त्याने कॉर्पोरेट स्थान मिळवून दिले. नोव्हेंबर 2017 मध्ये ‘व्हाण डॉट इन’ हे ऑनलाईन शॉपिंग पोर्टल त्याने सुरू केले. कोल्हापुरी चपलांसह महाराष्ट्रातील इतर प्रकारच्या चपला ऑनलाईन मिळू लागल्या. याबद्दल भूषण कांबळे म्हणतो, लहानपणी जेव्हा मी दुकानात जायचो तेव्हा आळंदी, वाई, कोल्हापूर तसेच कर्नाटकातूनही अनेक कारागीर आपल्या चपला घेऊन यायचे. पण हळूहळू ही कारागिरांची संख्या कमी होऊ लागली. मी वडिलांना याचे कारण विचारले. तर त्यांनी सांगितले की, अनेक जुन्या कारागिरांनी चपला बनवणे बंद केले आहे. काही जणांनी शेतात राबणे पसंत केले तर काही जण एमआयडीसीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करू लागले. ज्यांनी जवळपास 30 ते 40 वर्ष ही कारागिरी केली. किंबहुना ही संस्कृती जपण्याचे कार्य केले त्यांनी हे काम बंद केले. याचा परिणाम म्हणजे राज्यातल्या अशा वैशिष्टय़पूर्ण चपला तयार होणेच बंद झाले. एक कला लोप पावत चालली होती. त्यामुळे या कारागिरांना हाताशी धरून मी हे स्टार्टअप सुरू केले. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वीच खार येथे दुकानही सुरू केले आहे. असे त्याने सांगितले.

जुन्या कारागिरांना या चपलांचा इतिहास, त्यांची बांधणी याचे शास्त्राsक्त ज्ञान होते. त्यामुळे त्यांची कला वेगळी ठरायची. ज्याप्रमाणे आपल्याकडे प्रत्येक मैलावर भाषा, खाद्यसंस्कृती, संगीत, पेहराव बदलतो तसे चपलांच्या पद्धतीही बदलतात. त्यामुळे त्या भागाची खासियत त्या चपलांमध्ये उतरते. या स्टार्टअपच्या माध्यमातून या कारागिरांचे डॉक्युमेंटेशन, त्यांच्या कलेचे इतरांना प्रशिक्षण, ग्राहकांचा प्रतिसाद,  कौशल्य विकास करण्यात येते. कोल्हापुरी चपलांच्या पलिकडे जाऊन महाबळेश्वरी चपला, शाहू वहाण, चेपल्या, कापशी चपल्या या संकेतस्थळावर आणि उपलब्ध असतात. शरिराला इजा होणार नाही अशा ‘व्हेजिटेबल टॅन लेदर’चा वापर चपला बनविण्यासाठी केला जातो. हिरडा आणि बाभळी यांच्यावर 40 दिवसांची प्रक्रिया करून हे नैसर्गिक लेदर तयार करण्यात येते.

Related posts: