|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » अनिल देशमुख दिब्रिटोंना भेटणार

अनिल देशमुख दिब्रिटोंना भेटणार 

संमेलनाध्यक्ष म्हणून घेतलेल्या भूमिकेशी गृहमंत्री सहमत

दिब्रिटोंच्या भाषणाने महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढली

मुंबई / प्रतिनिधी

उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी देशातील धोरणकर्त्या वर्गाला केलेले आवाहन विचार करण्यासारखे आहे. महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि वैचारिक क्षेत्राचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या या मंचावर अध्यक्षांनी व्यक्त केलेल्या भावनांची दखल घेऊन त्याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी मी दिब्रिटो यांची भेट घेणार आहे. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांच्या सोयीने ही भेट होईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दिली.

देशातील ढासळत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीच्या विरोधात मराठी साहित्यिकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून आवाज उठवला आहे. धर्मांध वातावरण, वाढती असहिष्णुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच, गोहत्येच्या संशयावरून अल्पसंख्याकांचे घेतले जाणारे सामूहिक बळी, जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाण आदींविषयी साहित्यिकांनी ताशेरे ओढले आहेत.

यापार्श्वभूमीवर बोलताना देशमुख म्हणाले, दिब्रिटो यांनी केलेली वैचारिक मांडणी म्हणजे आज देशातील राजकारणासमोर उभ्या असलेल्या प्रश्नांना समजून घेण्याची सोपी वाटच आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला स्पष्ट, परखड आणि कणखर विचार व्यक्त करण्याची फार मोठी परंपरा आहे. फादर दिब्रिटो यांनी सर्व भेदांच्या पलिकडे जाऊन देशाच्या भल्याची सर्वसामावेशक भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राची प्रतिष्ठा उंचावणाऱया त्यांच्या भाषणाने सर्वच राज्यकर्त्यांना जबाबदारीचे भान दिले आहे. त्यांच्या भावनांची दखल घेऊन याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी मी त्यांची भेट घेण्याचे ठरविले आहे.

Related posts: