|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » उभरती कलाकार सेजल कदमची अकाली ‘एक्झीट’

उभरती कलाकार सेजल कदमची अकाली ‘एक्झीट’ 

प्रतिनिधी / रत्नागिरी :

शहरातील नृत्यासह मॉडेलिंगमध्ये पारंगत तसेच चित्रपटातून छोटय़ा भूमिका साकारणाऱया सेजल मिलिंद कदम हिच्या अल्पशा आजारी निधनाने सारी रत्नागिरी हळहळली. शनिवारी सकाळी कोल्हापूर येथे उपचारादरम्यान तिचे निधन झाले. पोलीस अधीक्षक कार्यालयात सेवेत असलेल्या मिलिंद कदम व कोमल कदम या दाम्प्त्याची ती कन्या होती.

  पंधरा दिवसांपूर्वी सेजल हिची अचानक तब्येत बिघडली होती. कुटुंबियांनी तिला स्थानिक डॉक्टरांकडून तपासणी केली. त्यानंतर अधिक उपचारासाठी तिला कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच शनिवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली. सेजलच्या मृत्यूचे वृत्त रत्नागिरी शहरात पोहोचताच साऱयांनाच धक्का बसला. सेजलला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. ती अगदी शालेय जीवनापासूनच नृत्याचे शिक्षण घेत होती. गेली 10 वर्षे नृत्याच्या विविध प्रकारात ती पारंगतही झाली होती. शहरातील किरण डान्स ऍकॅडमीमार्फत गेली 7 वर्षे ती मुंबई, कोल्हापूर, गोवा येथे नृत्य, मॉडेलिंगचे शो करीत होती. वर्षभरापूर्वी दोन छोटय़ा चित्रपटातूनही तिने भूमिका साकारल्या होत्या. 

  सेजल आपले नृत्य, मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी मेहनत घेत होती. भविष्यात नृत्य विशारद होण्याचे तिचे स्वप्न होते, असेही तिच्या आप्तजनांकडून सांगितले जाते. पण तिचा हा उभरता प्रवास नियतीने रोखला. तिच्या निधनाचे वृत्त कानावर पडताच तिचा व कदम कुटुंबियांच्या साऱया मित्रपरिवाराने शहरातील सन्मित्रनगर येथील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. शनिवारी दुपारी सेजलचा मृतदेह तिच्या निवासस्थानी आणण्यात आला. यावेळी शेकडो रत्नागिरीकरांसह, नातेवाईक, पोलीस कर्मचारी, अधिकारी अंत्यदर्शनासाठी दाखल झाले होते. दुपारी सेजलच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या अकाली निधनाने कदम कुटुंबियांसह पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

Related posts: