|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणातील आगीत भंगार गोडावून बेचिराख!

चिपळुणातील आगीत भंगार गोडावून बेचिराख! 

प्रतिनिधी / चिपळूण :

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण-पिंपळीखुर्द येथील रस्त्यालगत असणाऱया भंगार गोडावूनला रविवारी सकाळी 10.30 वाजता भीषण आगून सर्व गोडावून बेचिराख झाले. यात मालकाचे सुमारे 12 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे तासभर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती 

  मुस्तफा खान यांच्या मालकीचे हे भंगार गोडावून आहे. पिंपळीखुर्द येथे गेल्या अनेक वर्षापासून खान यांचे हे गोडाऊन आहे. यामध्ये मोठय़ाप्रमाणात रद्दी ठेवण्यात आली होती. तसेच अन्य भंगारही होते. रविवारी सकाळी 10.30 वाजता या गोडावूनला अचानक आग लागली. काहीवेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे प्रचंड लोळ उठले आणि धुराने सारा परिसर व्यापला गेला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. राष्ट्रीय महामार्गावर धुराचे लोट उठल्याने या मार्गावरची वाहतूक एक तास बंद पडली.

  या आगीची माहिती चिपळूण नगर परिषद, लोटे एमआयडीसी यांना देण्यात आली. त्यामुळे दोन्हीठिकाणचे अग्निग्नशमन बंब याठिकाणी दाखल झाले. तसेच खासगी टँकरनेही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र संपूर्ण गोडावून खाक झाल्याने खान यांचे सुमारे 12 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नसले तरी या गोडावूनच्या मागील बाजूला असणाऱया प्लास्टीकला कुणीतरी आग लावली आणि त्यातूनच ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. ही आग लागताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनेपासून काही अंतरावर लोकवस्ती असल्याने भीती निर्माण झाली होती. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती विनोद झगडे यांनी भेट देऊन पाहणी केली.

गोडावूनला परवानगी आहे का?

  गेल्या काही वर्षापासून भंगार गोडावूनना आग लागण्याचे प्रकार वाढीस चालले आहेत. सध्या शहरापासून अगदी ग्रामीण भागापर्यंत बक्कळ पैसा मिळवून देणारा हा व्यवसाय थाटला जात आहे. याला ग्रामपंचायत व नगर परिषद यांचा नाहरकत दाखलाही घेतला जात नाही. आपल्या सोयीनुसार शहरातील एका व्यक्तीकडे असलेल्या परवानगीच्या दाखल्याची झेरॉक्सप्रत गोडावूनमध्ये लावून राजरोसपणे हा व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे लगतच्या रहिवाशांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे या गोडावूनसह अन्य गोडावूनना परवानगी आहे का, याचा संबंधित विभागाने शोध घेण्याची मागणी होत आहे.

Related posts: