|Monday, January 27, 2020
You are here: Home » संवाद » आगळी शिक्षणसेवा

आगळी शिक्षणसेवा 

इं ग्रजी शिक्षणाचे फॅड आणि खासगी शाळांमधून शिक्षण घेण्याकडे वाढता ओढा यामुळे सरकारी शाळांमधील पटसंख्या घटत चालली आहे. मात्र, या समस्येवर  आर्थिक मदतीतून शिक्षकांनी मार्ग काढला आहे. विद्यार्थी संख्या टिकून रहावी व घर ते शाळेपर्यंतचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च शिक्षकच करत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत शिक्षण सेवेबरोबरच प्रवासाची आर्थिक सेवा शिक्षकवर्गच बजावत आहेत.

शहरातील सरकारी शाळांमध्ये उपनगरीय भागातून शाळेला येणाऱया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मात्र त्यांना शाळेला येण्यासाठी वाहनांची सोय नसल्याने कसरत करावी लागत आहे. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांना ने-आण करण्याची जबाबदारी शिक्षकांनी उचलली असून शिक्षकच शिक्षण सेवेतील सारथी बनले आहेत. विद्यार्थ्यांना घरापासून शाळेत आणण्यासाठी व परत शाळेतून घरी नेण्यासाठी रिक्षासेवा उपलब्ध करून देत त्या रिक्षाचे महिन्याचे भाडे शिक्षक आपल्या खिशातून देत आहेत. यामुळे शाळेचे अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी केला जाणारा प्रयत्न   विद्यार्थ्यांसाठी लाभदायक आहे.

शिक्षकांकडून वैयक्तिकरित्या दररोज शाळेला येताना विद्यार्थ्यांना ने-आण करण्याची जबाबदारी पार पाडली जात आहे. दररोजच्या प्रवासात एखादा विद्यार्थी शाळाबाह्य दिसल्यास सदर विद्यार्थ्याचे नाव शाळेत दाखल करून पालकांशी संवाद साधून शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम शिक्षक बजावत आहेत.

शिक्षणखात्याकडून बजाविण्यात येणाऱया कामाव्यतिरिक्त शाळांची पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांकडून ही आगळी शिक्षणसेवा बजाविली जात आहे. शाळेत कार्यरत शिक्षकांकडून महिन्याकाठी पैसे जमा करून रिक्षाची वर्दी भागविली जात आहे. यामुळे शाळांचे अस्तित्त्व टिकवून ठेवण्यात शिक्षकवृंददेखील आपले योगदान देत आहेत.

 

Related posts: