|Monday, January 27, 2020
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » सुलेमानीच्या हत्येत इस्रायलचाही हात

सुलेमानीच्या हत्येत इस्रायलचाही हात 

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था :

जगभरात स्वतःचे गुप्तचर जाळे तसेच सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रसिद्ध इस्रायलने इराणचे मेजर जनरल कासिम सुलेमानी यांच्या खात्म्याकरता अमेरिकेला मदत केली होती. सुलेमानी कुठल्या विमानाने बगदाद विमानतळावर पोहोचत आहेत याची माहिती इस्रायली गुप्तचर यंत्रणांनीच पुरविली होती असे आता समोर आले आहे.

याचबरोबर अमेरिकेच्या या कारवाईसंबंधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांना खडानखडा माहिती होती. नेतान्याहू यांची अमेरिकेची विदेशमंत्री माईक पॉम्पियो यांच्याशी यासंबंधी चर्चा झाली होती. 

बगदाद विमानतळाच्या दोन सुरक्षा अधिकारी आणि चाम एअरलाइन्सच्या दोन कर्मचाऱयांनी कासिम सुलेमानी संबंधी अमेरिकेला माहिती पुरविली होती. चाम एअरलाईन्सच्या विमानातूनच कासिम सुलेमानी बगदाद येथे पोहोचले होते.

विमानात होता गुप्तचर

एअरलाईन्सच्या कर्मचाऱयांपैकी एक जण दमास्कस विमानतळावर काम करत होता. तर दुसरा त्याच विमानातून प्रवास करत होता. याचबरोबर 4 अन्य खबऱयांनी कासिम सुलेमानीच्या हालचालींची माहिती अमेरिकेला पुरविली होती.

इराणमधील निदर्शकांवर गोळीबार

युक्रेनचे विमान आपल्याच चुकीमुळे कोसळल्याची कबुली इराण सरकारने दिल्यावर तेथील लोक रस्त्यांवर उतरून निदर्शने करत आहेत. इराणमधील सरकारविरोधी निदर्शनांना मोठे स्वरुप प्राप्त झाले आहे. या निदर्शनांना रोखण्यासाठी इराणच्या पोलिसांनी गोळीबार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी निदर्शकांवर अश्रूधूराचा मारा करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण इराणच्या पोलीस महासंचालकांनी गोळीबार झाला नसल्याचा दावा केला आहे.

 

Related posts: