|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वाहनाच्या धडकेत बिबटय़ा ठार

वाहनाच्या धडकेत बिबटय़ा ठार 

प्रतिनिधी /ढेबेवाडी :

काळगाव-तळमावले रस्त्यावर पहाटेच्या सुमारास धामणी गावापासून जवळच अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने सव्वा वर्षाच्या बिबटय़ाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच वनविभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सकाळपासून मृत बिबटय़ाला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. 

धामणी, काळगाव परिसरात बिबटय़ा असल्याची व दिसल्याची लोकांच्यात चर्चा होती. सोमवारी पहाटे बिबटय़ाच्या अपघाती मृत्यूने बिबटय़ाच्या अस्तित्वाची खात्री झाली आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास धामणी गावापासून काही अंतरावर भावके वस्तीच्या पुढे बिबटय़ा ओढय़ाकडील पाणवठय़ाकडून डोंगराच्या दिशेला निघाला होता. यावेळी काळगावकडून येणाऱया अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामुळे सव्वा वर्षाचा बछडा जागीच ठार झाला. यावेळी बछडय़ाबरोबर त्याची आईही असावी, असा अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱयांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी वनक्षेत्रपाल काळे यांनी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करण्यात आला. मृत बिबटय़ाचे पोस्टमॉर्टेम करण्यात येणार आहे. त्यानंतर इन कॅमेरा त्याचे दहन केले जाणार आहे. या प्रकरणी अज्ञात वाहनविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती काळे यांनी दिली.

दरम्यान, बछडय़ाच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच मानवी वस्तीच्या अगदी जवळ बिबटय़ाचा वावर असल्याने भीतीचे वातावरणही निर्माण झाले आहे.

Related posts: