|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भाडे थकल्याने मटण मार्केटला मनपाचे टाळे

भाडे थकल्याने मटण मार्केटला मनपाचे टाळे 

प्रतिनिधी / बेळगाव :

महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळय़ांचे भाडे थकल्याने टाळे ठोकण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला आहे. कसाई गल्लीतील मटण मार्केटमधील 40 गाळय़ांचे 46 लाख रुपये भाडे कित्येक वर्षांपासून थकल्याने मटण मार्केटला टाळे ठोकण्याची धडक कारवाई महापालिकेने केली. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच 40 व्यापारी गाळय़ांना टाळे ठोकण्याची कारवाई राबविण्यात आली.

महापालिकेच्या मालकीची व्यापारी संकुल आणि मार्केट आहेत. पण भाडेवाढ झाल्यानंतर गाळेधारकांनी महापालिकेला भाडे भरण्यास टोलवाटोलवी चालविली होती. यापूर्वी गाळे व्यवस्थित नसल्याचा आरोप करून भाडे भरण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नवीन इमारत बांधून मटण मार्केटसाठी उपलब्ध करून दिली आहे. तरीदेखील गाळेधारकांनी भाडे भरण्यास चालढकल चालविली होती. मटण मार्केटमध्ये 40 गाळे असून, 46 लाख रुपये भाडे थकले आहे. भाडे भरण्यासाठी महसूल विभागाने गाळेधारकांना अनेकवेळा सूचना केल्या होत्या. तरीदेखील गाळेधारकांनी भाडे भरले नाही. त्यामुळे महापालिकेच्या महसूल विभागाने टाळे ठोकण्याची धडक मोहीम सोमवारी सकाळी राबविली. यावेळी येथील कत्तलखान्यालाही टाळे ठोकण्यात आले.

या ठिकाणी मटण मार्केटला चार प्रवेशद्वारे असून, चारीही प्रवेशद्वारांना सीलबंद करण्यात आले. ही कारवाई करताना गाळेधारकांनी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. पण महापालिकेचे भाडे भरले नसल्याने ही कारवाई करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला असल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱयांनी गाळेधारकांना सांगितले. भाडय़ाची रक्कम तातडीने भरल्यास गाळे खुले करून देण्यात येतील, असे सांगितले. याबाबत आयुक्तांशी चर्चा करण्याची सूचना मनपा अधिकाऱयांनी गाळेधारकांना केली. त्यानंतर गाळेधारकांनी आयुक्तांना भेटण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टाळे ठोकण्याची कारवाई करून गाळय़ांचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. यावेळी महसूल निरीक्षक नंदू बांदिवडेकर, अनिल बिर्जे, शिवा जाधव, संजय गंगाधर आदींसह मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.

दंड माफ केल्यास भाडे भरण्याची तयारी

मटण मार्केटमधील गाळय़ांचे भाडे यापूर्वी 450 रुपये होते. मात्र, यामध्ये अचानक वाढ करून ते हजार रुपये करण्यात आले. तसेच दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे गाळेधारकांनी भाडे भरले नाही. स्वच्छतेकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. मार्केटमध्ये पाणी व आवश्यक सुविधा उपलब्ध नसतानाही भरमसाट भाडे आकारण्यात येत असल्याचा आरोप गाळेधारकांनी केला. दंडाची रक्कम माफ केल्यास थकीत भाडे भरण्याची तयारी असल्याची माहिती गाळेधारकांच्यावतीने मुन्ना सर्फराज खान यांनी दिली.

अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख अर्जुन देमट्टी निवृत्त झाल्यानंतर या पथकाची विभागणी दक्षिण आणि उत्तर अशी करण्यात आली आहे. त्यामुळे या पथकाला वाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. अतिक्रमण हटविताना पथकातील कर्मचाऱयांवर धावून जाण्याचा प्रकार नागरिकांनी केला. त्यामुळे ही कारवाई करताना निवृत्त झालेले अधिकारी अर्जुन देमट्टी यांची मदत महसूल विभागाच्या अधिकाऱयांना घ्यावी लागली.  

 

Related posts: