|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अणुसंशोधन विकसीत करण्यासाठी एकत्रीत प्रयत्नांची गरज : अणूशास्त्रज्ञ डॉ. भोजे

अणुसंशोधन विकसीत करण्यासाठी एकत्रीत प्रयत्नांची गरज : अणूशास्त्रज्ञ डॉ. भोजे 

माधवनगर/प्रतिनिधी

हजारो वर्षे पुरेल इतकी अणुउर्जा उपलब्ध आहे. ही उर्जा शुध्द आहे. लोकसंख्या वाढत जाईल तशी उर्जेची गरज प्रचंड वाढणार आहे. या परिस्थितीत अणुउर्जेबाबतचे गैरसमज बाजुला ठेऊन अणुसंशोधन विकसीत करण्यासाठी एकत्रीत प्रयत्न होण्याची गरज आहे, असे मत अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांनी व्यक्त केले.

प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील यांच्या 88 व्या जयंतीनिमीत्त नवभारत शिक्षण मंडळ, सांगली आणि प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील सोशल फोरमच्यावतीने देण्यात येणार्‍या यंदाच्या कर्मयोगी पुरस्काराने डॉ. शिवराम भोजे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फोरमचे अध्यक्ष, जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते. एक लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, घोेंगडी आणि पगडी देऊन मान्यवरांच्या हस्ते डॉ. भोजे यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. भोजे यांनी यावेळी आपल्यासोबत भारतातील अणुसंशोधन आणि सयंत्राचाही प्रवास सांगितला. ते म्हणाले, अणुउर्जेबाबत समाज प्रबोधन व्हायला हवे. आज सोलर उर्जेचा वापर वाढत असला तरी ती उर्जा पाहिजे तेव्हा मिळणारी नाही. अणुउर्जेला पर्याय नाही. अमेरिकेने अणुउर्जेचा वापर विध्वंसासाठी केला. त्यानंतर रशियाने अणुसयंंत्र तयार केले. आज चिनमध्ये ते उभारण्याचे काम सुरु आहे. भारतात जैतापुरला आपण ते तयार करणार होतो, पण त्यात बरेच प्रश्न उभे राहिले. आज 31 देशात 438 अणुसयंत्रे तयार आहेत. अणुभट्टीमध्ये अपघात झाले. त्सुमानीमुळे स्फोट झाले, पण एकही माणूस अणुकिरणामुळे दगावला नाही. अणुमुळे नाही तर अणुच्या अज्ञानामुळे अपघाताच्या घटना घडल्याचे सांगून अणू विध्वंसक रुप धारण करु शकते या गैरसमजातून या प्रकल्पांना विरोध होत असल्याची खंत डॉ. भोजे यांनी व्यक्त केली.

डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपण आजही कर्मकांडात अडकून वाहवत जाणार असू आणि वैज्ञानिकदृष्टीचा वापर रोजच्या जगण्यात करणार नसू तर डॉ. भोजे यांचा सत्कार अनाठायी ठरेल, याची जाणिव करुन दिली. विज्ञानवादी व्हा असा सल्ला त्यांनी दिला.

स्वागत संस्थेचे संचालक गौतम पाटील यांनी केले. प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील यांनी आयुष्यभर विज्ञानवाद जपला. हाच विज्ञानवादी विचार जपणार्‍या डॉ. भोजे यांचा सत्कार म्हणजे विज्ञानाचा सत्कार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक शांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवाराचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.

यावेळी सौ. उमा भोजे यांचा सत्कार मंजुश्री पवार यांच्या हस्ते तर श्रीमती कोंडूबाई भोजे यांचा सत्कार सौ.वसुधा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. राजेंद्र पोळ यांनी लिहीलेल्या मानपत्राचे वाचन उपसंचालक धनंजय माने आणि डॉ. प्रभा पाटील यांनी केले. सदानंद गाडगीळ यांनी सुत्रसंचालन केले तर आभार उपसंचालक तानाजीराव मोरे यांनी मानले.

कार्यक्रमास स्वातंत्र्यसैनिक जयराम कुष्टे, शिवाजीराव पवार, माधवराव माने, सनतकुमार आरवाडे, वैभव नायकवडी, फोरमचे सचिव बी.आर.थोरात, डॉ. बाबुराव गुरव, धनाजी गुरव, गौतमीपुत्र कांबळे, डॉ. सपना भाटे, ब्रिगेडीयर सुरेश पाटील, श्रीनिवास डोईजड, डॉ. कुबेर मगदूम, एम.के.अंबोळे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी, सर्व शाखांचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

पृथ्वीवर राहणं मुश्किल

उर्जेचा अपव्यय थांबलाच पाहिजे. 750 चॅनेल्स 24 तास सुरु असतात. पुढच्या पिढीसाठी आपण वीज वाचवणार आहोत की नाही? उर्जा वाचवली नाही तर पृथ्वीवर राहणं मुश्किल होईल, असा इशारा देऊन वाढत्या तापमानाने पावसाचे चक्र बदलले आहे. आपणाला आर्थिक विकास पाहिजे का पृथ्वीचेपर्यावरणाचे रक्षण पाहिजे हे ठरवून त्यावर काम केले पाहिजे, असे डॉ. भोजे यांनी सांगितले.

Related posts: