|Monday, January 27, 2020
You are here: Home » संवाद » करिअर, ओझे अपेक्षांचे

करिअर, ओझे अपेक्षांचे 

एकवीसावे शतक ‘हम दो हमारा/हमारी एक’ आणि म्हणूनच दोन मोठय़ांच्या अपेक्षांचं ओझं एका छोटय़ाशा खांद्यावर असण्याचं! एकच अपत्य ही एकवीसाव्या शतकाची भेट म्हणावी लागेल. तिसऱया चौथ्या वर्षापासूनच मूल, शाळा, अभ्यासवर्ग, संस्कारवर्ग, आनंदासाठी नव्हे तर स्पर्धेत जिंकण्यासाठी खेळ किंवा छंदवर्ग या सर्व गोष्टींच्या कचाटय़ात सापडतं. त्या मुलानं काहीतरी (पालकांना हवे ते) भव्य दिव्य करावं, सर्वोत्तम सर्वश्रे÷ ठरावं, अशी अवाजवी अपेक्षा केली जाते. आईवडिलांच्या करिअरमधील यश-अपयशाचे पडसादही मुलांच्या आयुष्यावर उमटतात. आईवडिलांचा उद्योगधंदा, पेशा, व्यवसाय मुलांनी सांभाळावा, वाढवावा अशी वाजवी वाटणारी अपेक्षा ते बाळगून असतात. पण डॉक्टरांच्या मुलाला रुग्ण आणि त्यांचे आजार याबद्दल भीती/किळस वाटू शकते. सेवाभावी वृत्तीचा अभाव किंवा अहोरात्र थकवून टाकणाऱया लाईफस्टाईलबद्दल तिरस्कार असू शकतो. आणि खूप मोठा उद्योजक बनण्याची इच्छा आणि आकर्षण त्याला वाटू शकते तर उत्तम सर्जन होणे हे एखाद्या बिझनेसमनच्या मुलाचे स्वप्न असू शकते. शेकडो एकर जमीन असणाऱया शेतकऱयाच्या मुलाला वकील बनावसं वाटू शकतं, पालकांनी मुलांकडून अपेक्षा करणं यात काहीच चूक नाही. पण त्या मुलांच्या निसर्गदत्त क्षमता/ गुणवैशिष्टय़े आणि आवड यांना प्राधान्य देणंच करिअरमधील यशासाठी आवश्यक आणि फायदेशीर. पूर्वयोजना योग्य रीतीने केल्यास मुलाची क्षमता/आवड आणि पालकांच्या अपेक्षा यांचा ताळमेळ घालता येणंही बऱयापैकी शक्मय असतं यासाठी योग्य नियोजनाची व मानसशास्त्राच्या मदतीची गरज असते. हे सारं पालकांनी लक्षात घेणं गरजेचे असते.

अभ्यासात (शालेय) काही मुलं फारशी चुणुक दाखवीत नाहीत. पण आवडीच्या कलाक्षेत्रात आगळीवेगळी हटके करिअर करायची असते. पालकांना मात्र यातील खाचखळगेच दिसत असतात. यशाच्या वाटेवरचे अडथळे पार करण्यासाठी जिद्द आणि चिकाटी लागते. आणि मळलेली वाट चालायची नसल्यामुळे येणारे अपयश पचवून पुन्हा उभारी घेण्यासाठी मानसिक बळ लागतं. इथे पालकांनीच पाठराखण करावी लागते. निराश झाल्यास प्रोत्साहन द्यावं लागतं. स्ट्रगल म्हटलं की ओढाताण, आर्थिक अस्थिरता आलीच. अशा मुलाला घेऊन मग आईवडील येतात. ‘त्याला जरा समजवा’ एवढीच त्यांची माफक अपेक्षा, ‘कॉन्सिलर’ म्हणून आमच्याकडून असते. चौदा ते चोवीस वयोगटातील मुलांना हे सगळं कसं समजावून द्यायचं, कोणत्या शब्दात समज द्यायची किंवा समजूत घालायची. पालकांच्या अपेक्षा आणि मुलांची स्वप्न यांचा सुवर्णमध्य कसा साधायचा, हे ठरविताना समुपदेशकाचं कसब पणाला लागतं. प्रगत मानसशास्त्र चमत्कार घडवू शकते, हे नक्की.

मुलाने पदवी दर्जेदार महाविद्यालयातूनच मिळवावी, अर्थात तेथील प्रवेशासाठी लागणारे गुणही मिळवावेत. तरच त्याचे करिअर होऊ शकते. यात सत्यांश असला तरीही समजा, अशी संधी हुकली तरीही पूर्वनियोजन केल्यास अशी साध्या कॉलेजमधील डिग्रीनंतर पोस्टग्रॅज्युएशनसाठी प्रयत्न करता येतात. शिवाय तुम्ही स्वतःचा उद्योगव्यवसाय सुरु करता, तेव्हा कौशल्य आणि अनुभव असला की पुरतं तुम्ही कोणत्या कॉलेजमधून डिग्री घेतली याला फारसं महत्व ठरत नाही. अपेक्षा, स्वप्नं जरुर बाळगा, पण सतत आशावादी राहा.

– डॉ. रमा मराठे

Related posts: