|Thursday, February 20, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘मेक्झिट’च्या निमित्ताने…

‘मेक्झिट’च्या निमित्ताने… 

इंग्लंडचा राजपुत्र हॅरी आणि त्याची पत्नी मेघन यांनी अलीकडेच आपल्याला राजघराण्यातून वेगळे व्हायचे आहे, अशी मागणी राणी एलिझाबेथसमोर ठेवली, तेव्हा त्यांना धक्का बसणे स्वाभाविकच होते. त्यांनाच काय, इंग्लंडमधील आणि जगभरातील अनेकांना या ‘मेक्झिट’मुळे (ब्रेक्झिटच्या धर्तीवर हा नवा शब्द तयार झाला आहे) धक्का बसला. राजघराण्यापासून फारकत घेऊन, राजघराण्याचे अधिकृत सदस्य म्हणून यापुढे न राहण्याची आणि शाही घराण्याचे ज्ये÷ सदस्य म्हणून भूमिका बजावण्यापासून निवृत्ती पत्करण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली आहे. हा पवित्रा मुळात राजघराण्याला बुचकळय़ातही टाकणारा होता. राजघराण्याचे वारस म्हणून मिळणारे आर्थिक फायदे नाकारून या दाम्पत्याला आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी व्हायचे आहे. ‘अनेक महिन्यांच्या चिंतनानंतर आणि अंतर्गत चर्चांनंतर आम्ही या वषी बदलाचा मार्ग निवडला आहे’, असे त्यांनी थेट इन्स्टाग्रामवर टाकले होते. म्हणजे त्यांनी निर्णय घेतल्याची अशी घोषणाच केली आहे. मात्र यापुढेही राणीसाहेबांना आमचा पूर्ण पाठिंबाच असेल, असेही त्यांनी जाहीर केले आहे. अर्थातच या निर्णयामुळे राजघराण्यात नाराजी आणि खेदाची भावना निर्माण झाली नसती तरच नवल. या घोषणेनंतर राणी एलिजाबेथ यांनी हॅरीचा भाऊ विल्यमसह एक बैठक आयोजित केल्याची बातमीही प्रसृत झाली. या चर्चेत काय निष्पन्न होते तो मुद्दा वेगळा. पण हॅरीला असा निर्णय घ्यावासा वाटला, हे महत्त्वाचे.

हॅरी व त्याचा भाऊ विल्यम यांच्यात सख्य नाही, तसेच त्याची पत्नी मेघन व विल्यमची पत्नी यांचेही संबंध मधुर नाहीत, असे म्हटले जात होते, याचा मात्र दोघांकडून इन्कार होत आहे. या घोषणेनंतर तर अशा बातम्यांची जास्तच चर्चा होत आहे. अर्थात हा झाला व्यक्तिगत जीवनाचा भाग. याप्रकारचा ‘वेगळं व्हायचंय मला’ पवित्रा सामान्य घरांपासून बडय़ा लोकांपर्यंत अनेक घरांमधूनही बघायला मिळतो. पण आजवर राजघराण्याच्या सदस्याने अशा तऱहेची भूमिका घेतली नव्हती. अपवाद करायचा झाला, तर तो ब्रिटिश राजघराण्यातल्याच आठव्या एडवर्डचा. एका घटस्फोटित अमेरिकन महिलेशी विवाह करण्यासाठी त्याने राजसिंहासनावर पाणी सोडले होते. हॅरीने काही याप्रकारे सिंहासन गमावलेले नसले, तरी राजघराण्याचे वलय आणि सुरक्षितता सोडण्याची भूमिका त्याने घेतली आहेच.

हॅरी आणि मेघन सध्या कॅनडात आहेत आणि कदाचित ते तिथेच राहण्याची शक्मयता आहे. मेघन मुळात एक अभिनेत्री आहे. आपल्या स्त्रीवादी भूमिकांसाठीही ती चर्चेत राहत आली आहे. हॅरीसोबत तिचे नाव जोडले गेले आणि त्यांनी लग्नही केले. त्यावेळी मेघनही घटस्फोटित होती. अर्थातच यावरूनही खूप उलटसुलट चर्चा घडल्या. एका सामान्य घरातली तरुणी राजघराण्यात सून म्हणून गेली. घरातील इतरांशी या दोघांचे असलेले संबंध काहीसे तणावाचे राहिले. राजघराण्यातली औपचारिक व समारंभपूर्ण कर्तव्ये पार पाडणेही त्यांना आवडत नव्हते. त्यात हॅरी व विल्यम यांच्यातही सारखे बिनसत असे. अशा कारणांमुळे आणि हॅरी व मेघन यांना सर्वसामान्य जीवन जगण्याची असलेली इच्छा यातून त्यांना राजघराण्याशी फारकत घ्यावीशी वाटली. यानंतरच्या जीवनात आर्थिक कारणांसाठी त्यांना आता काम करावे लागणार. आपल्या सेलेब्रिटी स्टेटसचा त्यांना यासाठी भविष्यात उपयोग होईलही. पण तो त्यांना करावा लागेल, हे महत्त्वाचे. राजघराण्याचा हाही फायदा घ्यायचा की नाही, ते त्यांनाच ठरवावे लागणार आहे. कुणालाही आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार असतोच, तो या दोघांनाही का नसावा? त्यामुळे त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छाच आहेत.

राजेशाही ही जगभरची एक प्राचीन व्यवस्था आहे. आज बऱयाच ठिकाणी ती नामशेष झाली आहे, तर काही ठिकाणी अजूनही ती पहिल्यासारखीच चालू आहे. अरब राष्ट्रांमध्ये राजेशाही आहे. इंग्लंडमध्ये लोकशाही व्यवस्था असली, तरी राजेशाहीला एक विशिष्ट महत्त्व अन् मानाचे स्थान आहे. भारतातली राजेशाही 15 ऑगस्ट 1947 रोजीच संपली. कारण इथली 565 पैकी बहुतेक, म्हणजे 560 संस्थाने भारतात विलीन झाली. पण तरीही जुनागड, जम्मू-काश्मीर, हैदराबादसारखी काही संस्थाने राहिली होती, त्यांनाही नंतरच्या टप्प्यावर भारतात सामील करून घेतले गेले. त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी झाली. या संस्थानांशी करार करून, संस्थानिकांना दरमहा तनखा देण्याचा निर्णय झाला. तसे झाले नसते तर कदाचित ही सारी प्रक्रिया लांबत राहिली असती आणि देशाला त्रासही झाला असता. भारताला अखंडित व एकत्र ठेवण्याच्या दृष्टीने हे आवश्यक पाऊलच होते. पुढे 1971 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी हे तनखे बंद करण्याचा निर्णय घेऊन या प्रकरणावर पडदाच टाकला. भारतातली ही तनखाची पद्धत एकप्रकारे ब्रिटनमध्येही चालू आहेच. ‘सॉव्हरिन ग्रँट’च्या नावाखाली इंग्लंडच्या राजघराण्याचा खर्च विशिष्ट थाटाने चालवण्याची जबाबादारी व बंधन ब्रिटनच्या संसदेवर आहे आणि हा निधी अर्थातच करदात्यांच्या पैशातूनच तर पुरवला जातो. यात मग राजमहालांचा देखभाल खर्च, त्यांच्या कार्यालयांचा, विहित कामासाठी लागणाऱया गोष्टींचा तसेच कार्यक्रमांचा खर्च हे सारे यात मोडते. हॅरी आणि मेघन यांनाही या ग्रँटचा फायदा यापूर्वी मिळाला आहे. विंडसर इस्टेटमधले त्यांचे नवे घर सजवताना तो फायदा त्यांनी घेतला होता. त्यावेळी काही त्यांनी आर्थिक स्वावलंबनाचा पवित्रा घेतलेला नव्हता. तेही ठीकच. पण यापुढे त्यांना स्वबळावर जगायचे आहे. अर्थातच त्यांच्याकडे स्वतःची अशी संपत्तीही कमी नाही. यापुढची त्यांची वाटचाल यथावकाश समजेलच. आपल्याकडेही तनखे पूर्णच बंद झाल्यानंतर संस्थानिकांनी आपापल्या वाटा निवडल्याच. कुणी उद्योग व्यवसायात अधिक लक्ष घातले. राजस्थान वगैरे ठिकाणी राजवाडय़ांचे रूपांतर हॉटेलांमधून झाले. बरेच संस्थानिक आपल्या वलयाचा फायदा घेऊन लोकनेते बनले. संसदीय राजकारणात उतरले. निवडणुकीत त्यांना यश मिळणे हे स्वाभाविक होते. तिथेही मग घराणेशाही चालू राहतेच. एकूण काय, तर  लोकशाही असलेल्या भारतासारख्या देशातली राजेशाही केव्हाच गेली, पण अजूनही भूतपूर्व राज्यकर्त्या घराण्यांच्या मनातली वर्चस्व भावना आणि त्यांच्या ‘राज्या’तल्या प्रजेची या लोकांकडे बघण्याची दृष्टी तशीच आहे. इतकेच काय, सामान्य स्तरावरून राजकारणात पुढे आलेल्यांचीही घराणी तयार होतातच. वारसाहक्काने तिथेही निवडणुकीची तिकिटे आणि इतर आनुषंगिक फायदे मिळतात. साध्या नगसेवक किंवा नगरसेविकेची मुलेही दादा-ताई बनून नाक्मया नाक्मयावरल्या पोस्टरवर झळकतात आणि भविष्यातले नेते म्हणून पुढे केले जातात. शिवाय, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, ऍक्टरचा मुलगा ऍक्टर म्हणून चालतो, तर मग नेत्यांनी काय पाप केलंय, असा पवित्रा घेतला जातो. मुख्य मुद्दा हा की, संसदीय राजकारणात निर्माण झालेली इतरही ‘घराणी’ राजेशाही पद्धतीनेच वागतात आणि लोकांनी तसे वागण्याची अपेक्षा धरतात. हे कधी बदलणार, की बदलणारच नाही?

नंदिनी आत्मसिद्ध

Related posts: